Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक यांच्यातर्फे इयत्ता नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांसाठी आवाहन

 जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक यांच्यातर्फे इयत्ता नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना आवाहन



नाशिक:- मागील वर्षीप्रमाणे यंदाही जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक यांच्या वतीने इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्व नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे.  

इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू असून १७ मार्च रोजी संपणार आहेत. त्यामुळे परीक्षेनंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली पाठ्यपुस्तके विक्री न करता गरजू विद्यार्थ्यांना दान करावीत. त्याचप्रमाणे नववीच्या विद्यार्थ्यांनीही आपल्या परीक्षा झाल्यानंतर पुस्तके दान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दान करण्यात आलेली पुस्तके संकलित करून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वितरित केली जाणार आहेत. विशेषतः, जे विद्यार्थी पुस्तके दान करतील त्यांच्या हस्तेच गरजू विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात येईल.  

विद्यार्थ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम असून, समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, विविध संस्था आणि नागरिकांनी यामध्ये सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी किंवा योगदान देऊ इच्छिणाऱ्यांनी खालील संपर्क क्रमांकावर संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत संपर्क साधावा. तरी ह्या उपक्रमात नाशिक शहरातील सर्व शाळा , मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिका, शिक्षक , विद्यार्थी, पालक, नागरीक, व्यवसायिक आदींनी सहभागी व्हावे. 

📞 संपर्क: 9529195688  

📧 ईमेल: jivankeshrimarathi@gmail.com  


(ठिकाण व आयोजनाची तारीख नंतर कळविण्यात येईल.)

रविवार, २ फेब्रुवारी, २०२५

 वेळेवर पाणीपुरवठा नाही? AI तंत्रज्ञान हा उपाय की कर्मचाऱ्यांसाठी धोका?

एआय प्रातिनिधिक चित्र 


शहर असो किंवा ग्रामीण भाग, नियमित पाणीपुरवठा ही आजही मोठी समस्या आहे. काही ठिकाणी वेळेवर पाणी येत नाही, काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी असतो, तर काही ठिकाणी अनेक दिवस पाणीच मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे अकार्यक्षम व्यवस्थापन, गळती, चुकीचे नियोजन आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव.

यावर उपाय म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान प्रभावी ठरू शकते. पण AI वापरल्यास कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका आहे का, याचाही विचार करणे गरजेचे आहे.

AI तंत्रज्ञान कसे उपयोगी ठरू शकते?

AI च्या मदतीने स्वयंचलित पाणीपुरवठा व्यवस्थापन करता येऊ शकते. स्मार्ट सेन्सर्स आणि डेटा अॅनालिटिक्स वापरून कोणत्या भागात किती पाणी आवश्यक आहे, हे पूर्वनियोजित करता येईल. झडपा आणि पंप स्वयंचलितरित्या सुरू-बंद करून वेळेवर पाणीपुरवठा करता येईल.

पाईपलाइनमधील गळती ओळखण्यासाठी AI सेन्सर्स वापरता येतात. यामुळे पाण्याची नासाडी टाळता येते आणि गळतीस त्वरित दुरुस्त करता येते. नागरिकांना SMS किंवा अॅपद्वारे पाणीपुरवठ्याची माहितीही देता येईल.

GPS आधारित टॅंकर ट्रॅकिंग वापरून टॅंकरचा प्रवास आणि वेळ निश्चित करता येईल. जिथे नळाद्वारे पाणी पोहोचत नाही, तिथे टॅंकर वेळेवर पोहोचण्याची खात्री होईल. टॅंकर कोठे आहे, किती पाणी वाटप झाले, याचा संपूर्ण डेटा अॅनालिटिक्स ठेवला जातो.

AI च्या मदतीने पाणी चोरी आणि अनधिकृत वापर ट्रॅक करता येतो. स्मार्ट मीटर्स वापरून अचूक पाणी वापराचा हिशोब ठेवता येतो आणि जास्त वापर करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवता येते.

AI मुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका आहे का?

हे खरे आहे की AI स्वयंचलितपणे अनेक कामे करू शकते, पण त्यामुळे माणसांची गरज संपणार नाही. AI हे मदतनीस म्हणून काम करेल, पर्याय म्हणून नव्हे. कर्मचारी डेटा विश्लेषण, देखभाल आणि सुधारणा यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. AI संपूर्णपणे माणसांच्या नियंत्रणाखाली असेल, त्यामुळे त्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज कायम राहील.

भविष्यातील बदल

AI मुळे नवीन प्रकारच्या नोकऱ्या निर्माण होतील. स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट ऑपरेटर, डेटा विश्लेषक, IoT आणि सेन्सर तज्ञ, तसेच पाणीपुरवठा मॉनिटरिंग तज्ञ अशी पदे निर्माण होतील.

निष्कर्ष

AI तंत्रज्ञानाचा वापर केल्यास वेळेवर पाणीपुरवठा सुनिश्चित करता येईल, गळती कमी करता येईल आणि जलसंपत्तीचा योग्य वापर करता येईल. AI हे कर्मचाऱ्यांचा पर्याय नसून त्यांना अधिक सक्षम करण्याचे साधन आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या नवीन तंत्रज्ञानासोबत जुळवून घेतल्यास पाणीपुरवठा यंत्रणा अधिक कार्यक्षम होऊ शकते.

पाणी ही अमूल्य संपत्ती आहे. AI च्या मदतीने आपण ते अधिक शहाणपणाने वापरू शकतो!


लेखक: जीवन केशरी मराठी माहिती संकेतस्थळ

सोमवार, २७ जानेवारी, २०२५

बाल शिक्षण मंदिर शाळेत ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

मविप्र संचलित बालशिक्षण मंदिर शाळेत ध्वजारोहण प्रसंगी प्रमुख पाहुणे, मुख्याध्यापक, शिक्षक , वेशभूषेत विद्यार्थी आदी.


नाशिक ( दि. २६ ) :- मराठा विद्या प्रसारक समाज संचलित बाल शिक्षण मंदिर गोरेराम लेन आणि आदर्श शिशु विहार शाळेत ७६ वा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शालेय समिती अध्यक्ष संजय ढिकले, कोशिरे, थेठे, किरण पाटील, नंदकिशोर तांबे, पुनमताई भोसले, वत्सलाताई खैरे आणि जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वाय. बी. गायधनी तसेच शिक्षकवृंद उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजपूजन आणि ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध आणि रंगतदार परेडने उपस्थितांचे लक्ष वेधले. शाळेतील गीत मंचाने देशभक्तीपर गीते सादर केली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत बाल शिक्षण मंदिर शाळेचे मुख्याध्यापक के. के. तांदळे यांनी गुलाब पुष्प देऊन केले. 

शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. इच्छा चव्हाण, रेणुका मानकर आणि स्वरूप बळावकर या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील भाषणांनी पालक व मान्यवरांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनाही उपस्थितांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

शालेय समिती सदस्य सुभाष पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गावले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.


रविवार, १९ जानेवारी, २०२५

अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्तीनिमित्त नाशिक शिवसेनेतर्फे भव्य आरतीचे आयोजन

 अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्तीनिमित्त नाशिक शिवसेनेतर्फे भव्य आरतीचे आयोजन

शिवसेनेच्या बैठकीत कार्यक्रमाबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती देताना शिवसेना उपनेते विजय करंजकर


नाशिक: अयोध्या येथील रामलल्ला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त नाशिक शिवसेनेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता रामकुंड, नाशिक येथे प्रभू श्रीरामाची आरती आणि गंगा-गोदावरीची महाआरती होणार आहे.

नाशिक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना उपनेते विजय करंजकर यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रामभक्त आणि शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय, शिवसेना पक्षाच्या वतीने २३ ते २७ जानेवारी दरम्यान 'भगवा पंधरवडा'चे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती (२३ जानेवारी) आणि धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती (२७ जानेवारी) साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आणि महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे, महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुक्रवार, १७ जानेवारी, २०२५

लाखोंच्या स्वागत कमानीच्या चोरीचा प्रयत्न हाणून पडला

 लाखोंच्या स्वागत कमानीच्या चोरीचा प्रयत्न हाणून पडला

शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांची सतर्कता; लेखानगर येथे घटना



नाशिक: जुने सिडकोतील लेखानगर येथे नाशिक महापालिकेच्या स्वागत कमानीचे अवजड लोखंडी सांगाडे चोरून नेण्याचा प्रयत्न शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांच्या सतर्कतेमुळे हाणून पडला. या घटनेमुळे लाखोंच्या महापालिकेच्या मालमत्तेची चोरी रोखण्यात यश आले आहे.

जुने सिडको येथील प्रवेशद्वारावर स्वागत कमान आणि दिशादर्शक फलक उभारण्यासाठी नाशिक महापालिकेने ८० लाख रुपयांची तरतूद केली होती. यासाठी कमानीचे अवजड लोखंडी सांगाडे लेखानगर येथे आणून ठेवण्यात आले होते. परंतु, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हे काम प्रलंबित राहिले, आणि सांगाडे तिथेच पडून होते. शुक्रवारी संध्याकाळी काही अज्ञात व्यक्तींनी गॅस कटरच्या सहाय्याने या लोखंडी कमानीचे तुकडे कापून आयशर कंपनीच्या ट्रक क्रमांक MH-46-F-5126 मधून साहित्य चोरून नेण्याचा प्रयत्न केला. 

शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे हे त्या परिसरातून जात असताना या प्रकाराची त्यांना माहिती मिळाली. त्यांनी तातडीने या प्रकाराचा विरोध केला व चोरट्यांची व्हिडीओ शूटिंग केली. त्यांच्या कडव्या विरोधामुळे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढी मोठी मालमत्ता चोरून नेण्याचा प्रयत्न सुरू असताना महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत का, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

प्रविण (बंटी) तिदमे यांनी महापालिकेकडे याबाबत तक्रार करण्याची तयारी केली असून चोरट्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. नाशिक महापालिकेने या घटनेची दखल घेत तत्काळ चौकशी करावी आणि जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. महापालिकेच्या मालकीच्या लाखोंच्या मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करणे ही प्रशासकीय जबाबदारी आहे.


सोमवार, १३ जानेवारी, २०२५

जनता विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थिनींचे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश

धनश्री गरकळला राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत तर तेजस्वी मोरेला लोकमत मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक! 

 स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करताना ज्येष्ठ शिक्षिका एस.डी. शेळके व मुख्याध्यापिका श्रीमती वाय.बी.गायधनी

नाशिक, दि. १३ जानेवारी २०२५ : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन येथे ( दि. ११ ) रोजी स्वामी विवेकानंद जयंती तथा राष्ट्रीय युवा दिन आणि राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाय.बी. गायधनी होत्या. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.एम.एस.पिंगळे व श्रीम.एस.डी.शेळके होत्या. 

कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवर व शिक्षकांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. इयत्ता आठवी क च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. कु. उत्कर्षा कापडणे हिने सूत्रसंचलन केले. कु. पूर्वा सूर्यवंशी, कृष्णाली बुटाले, जयेश धुर्जड, प्राची कोठे, सृष्टी परदेशी, मानसी चौधरी, तन्मय भोये या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी भाषणे सादर केली

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शालेय विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश. कु. धनश्री गणेश गरकळ हिने पुणे येथे आयोजित ५१ व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत ४८ किलोखालील गटात ज्युडो खेळप्रकारात नाशिक जिल्ह्यासाठी सुवर्णपदक पटकावले. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडही झाली आहे. तसेच कु. तेजस्वी सचिन मोरे हिने लोकमत महामॅरेथॉनमध्ये ३ किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.

ज्युडो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी धनश्री गरकळ हिला गुलाबपुष्प देऊन सत्कार करतांना शिक्षिका श्रीम. एस.बी.जाधव ( उजवीकडील )  व लोकमत मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी तेजस्वी मोरे हिचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करतांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम‌. वाय.बी. गायधनी ( डावीकडील ) व सर्व शिक्षक वृंद

"राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याचा मला अभिमान आहे. माझे प्रशिक्षक श्री. योगेश शिंदे, तुषार माळोदे आणि अनिकेत जाधव यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे यश शक्य झाले नसते. शाळेने दिलेल्या सर्व सुविधा आणि प्रोत्साहनाबद्दल मी कृतज्ञ आहे," अशी प्रतिक्रिया सुवर्णपदक विजेती धनश्री गरकळ हिने व्यक्त केली.

या यशस्वी विद्यार्थिनींचा मुख्याध्यापिका श्रीमती गायधनी यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. त्यांच्या वर्गशिक्षिका श्रीमती आर.एस. डेर्ले यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.

"आमच्या विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश हे शालेय शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासाचे द्योतक आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांप्रमाणे शारीरिक व मानसिक विकासावर आमचा विशेष भर असतो," असे मुख्याध्यापिका श्रीमती गायधनी यांनी सांगितले.

 सर्व शिक्षक वृंद विजेते विद्यार्थी व कार्यक्रमाचे आयोजन करणारे विद्यार्थी

कार्यक्रमाच्या समारोपात कु. अनुष्का जाधव हिने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती एस.एम. गायखे व ८ वी क च्या वर्गशिक्षिका श्रीमती आर.एस. डेर्ले यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

मंगळवार, ७ जानेवारी, २०२५

 घराला लागलेल्या आगीवर वेळेत नियंत्रण: मोठा अनर्थ टळला



नाशिक, ७ जानेवारी २०२५ - काकड बाग, मोरे मळा येथील विकास देवरे यांच्या घरात दि. ४ जानेवारी रोजी देवघरातील दिव्यामुळे लागलेल्या आगीने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. अचानक दुपारी घरातून धूर निघू लागल्याने व आगीचे लोळ दिसू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.  


घरात असलेल्या महिलेला व एका लहान बाळाला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांनी प्रसंगावधान राखत घरातील गॅसची टाकी तातडीने बाहेर काढली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले.  


अग्निशमन विभागाच्या लीडिंग फायरमन एस. जे. कानडे, एस. पी. मेंद्रे, आय. ए. पानसरे, अजय पाटील, आणि दिनेश चारोष्कर यांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे घराला अधिक हानी होण्यापासून व परिसराला धोका निर्माण होण्यापासून रोखण्यात यश आले.  


स्थानिक नागरिकांनी ॲड. सुरेश आव्हाड आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ मदतीसाठी आभार मानले. वेळेत मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सर्वांनी एकमुखाने मान्य केले.

Python मधील व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स आणि ऑपरेटर्स Python मधील व्हेरिएबल्स, डेटा टाइप्स आणि ...