घराला लागलेल्या आगीवर वेळेत नियंत्रण: मोठा अनर्थ टळला
नाशिक, ७ जानेवारी २०२५ - काकड बाग, मोरे मळा येथील विकास देवरे यांच्या घरात दि. ४ जानेवारी रोजी देवघरातील दिव्यामुळे लागलेल्या आगीने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. अचानक दुपारी घरातून धूर निघू लागल्याने व आगीचे लोळ दिसू लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली.
घरात असलेल्या महिलेला व एका लहान बाळाला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांनी प्रसंगावधान राखत घरातील गॅसची टाकी तातडीने बाहेर काढली, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले.
अग्निशमन विभागाच्या लीडिंग फायरमन एस. जे. कानडे, एस. पी. मेंद्रे, आय. ए. पानसरे, अजय पाटील, आणि दिनेश चारोष्कर यांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या तत्परतेमुळे घराला अधिक हानी होण्यापासून व परिसराला धोका निर्माण होण्यापासून रोखण्यात यश आले.
स्थानिक नागरिकांनी ॲड. सुरेश आव्हाड आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ मदतीसाठी आभार मानले. वेळेत मिळालेल्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सर्वांनी एकमुखाने मान्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा