जनता विद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थिनींचे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश
धनश्री गरकळला राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत तर तेजस्वी मोरेला लोकमत मॅरेथॉनमध्ये सुवर्णपदक!
![]() |
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करताना ज्येष्ठ शिक्षिका एस.डी. शेळके व मुख्याध्यापिका श्रीमती वाय.बी.गायधनी |
नाशिक, दि. १३ जानेवारी २०२५ : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन येथे ( दि. ११ ) रोजी स्वामी विवेकानंद जयंती तथा राष्ट्रीय युवा दिन आणि राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाय.बी. गायधनी होत्या. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.एम.एस.पिंगळे व श्रीम.एस.डी.शेळके होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवर व शिक्षकांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाली. इयत्ता आठवी क च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. कु. उत्कर्षा कापडणे हिने सूत्रसंचलन केले. कु. पूर्वा सूर्यवंशी, कृष्णाली बुटाले, जयेश धुर्जड, प्राची कोठे, सृष्टी परदेशी, मानसी चौधरी, तन्मय भोये या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्यावर प्रेरणादायी भाषणे सादर केली
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शालेय विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश. कु. धनश्री गणेश गरकळ हिने पुणे येथे आयोजित ५१ व्या सब ज्युनिअर राज्यस्तरीय व राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत ४८ किलोखालील गटात ज्युडो खेळप्रकारात नाशिक जिल्ह्यासाठी सुवर्णपदक पटकावले. तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडही झाली आहे. तसेच कु. तेजस्वी सचिन मोरे हिने लोकमत महामॅरेथॉनमध्ये ३ किलोमीटर स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले.
![]() |
ज्युडो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी धनश्री गरकळ हिला गुलाबपुष्प देऊन सत्कार करतांना शिक्षिका श्रीम. एस.बी.जाधव ( उजवीकडील ) व लोकमत मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी तेजस्वी मोरे हिचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करतांना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. वाय.बी. गायधनी ( डावीकडील ) व सर्व शिक्षक वृंद |
"राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाल्याचा मला अभिमान आहे. माझे प्रशिक्षक श्री. योगेश शिंदे, तुषार माळोदे आणि अनिकेत जाधव यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे यश शक्य झाले नसते. शाळेने दिलेल्या सर्व सुविधा आणि प्रोत्साहनाबद्दल मी कृतज्ञ आहे," अशी प्रतिक्रिया सुवर्णपदक विजेती धनश्री गरकळ हिने व्यक्त केली.
या यशस्वी विद्यार्थिनींचा मुख्याध्यापिका श्रीमती गायधनी यांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. त्यांच्या वर्गशिक्षिका श्रीमती आर.एस. डेर्ले यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.
"आमच्या विद्यार्थिनींनी क्रीडा क्षेत्रात मिळवलेले यश हे शालेय शिक्षणाबरोबरच सर्वांगीण विकासाचे द्योतक आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांप्रमाणे शारीरिक व मानसिक विकासावर आमचा विशेष भर असतो," असे मुख्याध्यापिका श्रीमती गायधनी यांनी सांगितले.
![]() |
सर्व शिक्षक वृंद विजेते विद्यार्थी व कार्यक्रमाचे आयोजन करणारे विद्यार्थी |
कार्यक्रमाच्या समारोपात कु. अनुष्का जाधव हिने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती एस.एम. गायखे व ८ वी क च्या वर्गशिक्षिका श्रीमती आर.एस. डेर्ले यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा