आदर्श शिशु विहार व बाल शिक्षण मंदिरात मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
![]() |
नाशिक:- विज्ञान प्रदर्शनात चिमुकल्यांचे प्रयोग बघतांना मान्यवर |
नाशिक, २८ फेब्रुवारी २०२५: मराठा विद्या प्रसारक समाज संचलित आदर्श शिशु विहार व बाल शिक्षण मंदिर, गोरेराम लेन येथे मराठी राजभाषा दिन अर्थात कुसुमाग्रज जयंती आणि राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास शालेय समिती सदस्य अरुण बापूराव थेटे, बारकू रामभाऊ कोशिरे, सुभाष गणपत पाटील, शाळेचे मुख्याध्यापक के.के. तांदळे, तसेच जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. वाय.बी. गायधनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांनी 'रमण प्रभावा'चा शोध लावला, त्याच्या स्मरणार्थ दरवर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. या शोधासाठी त्यांना १९३० मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इयत्ता मॉन्टेसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग तयार करून प्रदर्शन भरवले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाच्या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या प्रयोगांविषयी सविस्तर माहिती दिली.
याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठी राजभाषा दिनानिमित्त भाषणे व कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीचे आयोजनही करून मराठी भाषेचे महत्त्व आणि महती याविषयी जनजागृती केली.
शालेय समिती सदस्य सुभाष पाटील व शाळेचे मुख्याध्यापक के.के. तांदळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली गावले यांनी केले, तर कार्यक्रमाचे फलक लेखन सविता पेखळे व शितल गडाख यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा