स्काऊट गाईड विषय भविष्याच्या दृष्टीने गरजेचा – कविता वाघ
|
नाशिक:- आनंद मेळावा कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय स्काऊट गाईड नाशिक जिल्हा संघटक कविता वाघ |
नाशिक: मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय, गोरेराम लेन येथे दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी स्काऊट गाईड अंतर्गत ‘आनंद मेळावा - खरी कमाई’ उपक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्काऊट चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय स्काऊट गाईड जिल्हा संघटक कविता वाघ होत्या. आपल्या भाषणात त्यांनी स्काऊट गाईड शिक्षणाचे महत्त्व विशद करताना सांगितले, "विद्यार्थ्यांना स्वावलंबन, नेतृत्वगुण, आणि शिस्त यासारख्या जीवनोपयोगी कौशल्यांचा पाया स्काऊट गाईडमुळे मिळतो. आजच्या युगात हे शिक्षण विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरत आहे."
कार्यक्रमाची सुरुवात लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते. उपक्रमात सुमारे ४०-४५ स्टॉल्स उभारण्यात आले. पाणीपुरी, पावभाजी, गुलाबजाम, आणि इतर स्वादिष्ट पदार्थ हे आकर्षण ठरले. स्टॉल्सच्या सजावटीत विद्यार्थ्यांनी आपले सर्जनशील कौशल्य दाखवले.
विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे 'कमवा-शिका' हा मंत्र आत्मसात केला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. वाय. बी. गायधनी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले, "हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाची तत्त्वे आणि आत्मविश्वास निर्माण करतो. विद्यार्थ्यांचा सहभाग कौतुकास्पद आहे."
कविता वाघ यांनी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडच्या माध्यमातून मिळणाऱ्या शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध आणि जबाबदारीपूर्ण जीवनासाठी स्काऊट गाईडचा सक्रिय उपयोग करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. एम. एस. पिंगळे यांनी केले, तर प्रास्ताविक जनता विद्यालय गोरेराम लेनच्या मुख्याध्यापिका श्रीम. वाय. बी. गायधनी यांनी केले. आभारप्रदर्शन श्रीम. के. एम. घुमरे यांनी व्यक्त केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय व कौशल्य शिक्षणाचा अनुभव मिळाला. स्काऊट गाईडमधील प्रशिक्षण त्यांना भावी आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी जनता विद्यालय गोरेराम लेन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम वाय.बी.गायधनी , बाल शिक्षण मंदिर गोरेराम लेन शाळेचे मुख्याध्यापक श्री.के.के.तांदळे , भारतीय स्काऊट गाईड नाशिक जिल्हा संघटक कविता वाघ, जनता विद्यालय व बाल शिक्षण मंदिर शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य , सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थीवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.