बालशिक्षण मंदिर गोरेरामलेन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दणदणीत विजय
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित बालशिक्षण मंदिर गोरेरामलेन विद्यालयातील होतकरू विद्यार्थ्यांनी त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला. युवा स्फूर्ती संघ बेझे यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल पाच पारितोषिके पटकावून शाळेचे नाव राज्यभर गाजवले.
स्पर्धेत इयत्ता सातवीची विद्यार्थिनी इच्छा चव्हाण हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेत सुवर्णपदक आणि सात हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले. तर इयत्ता पाचवीचा स्वरूप बळावकर याने रजतपदकासह पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. कनिष्ठ गटातील या यशाने शाळेच्या वक्तृत्व परंपरेला उजाळा मिळाला आहे.
इयत्ता सातवीची ईश्वरी भालेकर हिने कांस्यपदक आणि तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले. तिच्याच वर्गातील समीक्षा वराडेने उत्तेजनार्थ बक्षिसासह एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले, तर इयत्ता सहावीचा सहास खैरनार याला विशेष पारितोषिक म्हणून पाचशे रुपये रोख बक्षीस मिळाले. सर्व विजेत्यांना प्रतिष्ठेच्या ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्रांनीही गौरवण्यात आले.
"आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ अभ्यासातील प्राविण्य पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने शाळा सातत्याने प्रयत्नशील असते," असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री. के.के. तांदळे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण शालेय परिवार आनंदित असून, येत्या काळात अशीच कामगिरी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
बालशिक्षण मंदिर गोरेरामलेन विद्यालयाने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून, या यशाने शाळेची शैक्षणिक व सहशालेय क्षेत्रातील वाटचाल अधिक बळकट झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील हे यश इतर विद्यार्थांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा