Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

 'एक तारीख - एक तास' स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया! 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई, दि. २९ : - स्वच्छतेसाठी 'एक तारीख, एक तास' या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.


'स्वच्छता पंधरवडा- स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात 'एक तारीख- एक तास' या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग नोंदवू शकणार आहेत. गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वार्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी विशेष शिबिरे-प्रदर्शने आयोजित केली जातील. ज्यातून स्वच्छतेची गरज, त्यांचे फायदे, महत्व पटवून दिले जाईल.


याबाबतच्या आवाहनात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, स्वच्छता आपल्या सर्वाच्या दैनंदिनीतील महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते अनेक थोर राष्ट्र पुरूष साधू-संतानीही स्वच्छतेबाबत आपल्याला धडे घालून दिले आहेत. याच अनुषंगाने आपल्या सर्वांना 'स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा' हे अभियान यशस्वी करायचं आहे. 'एक तारीख एक तास' या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-२ चा शुभारंभ केला. त्यातून महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा असे ध्येय घेऊन आता वाटचाल करत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्राला अनेक थोरा-मोठ्यांनी परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयीचा मंत्र दिला आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. आता या धड्यांची आपल्याला उजळणी करायची आहे. आपआपल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची आहे. साचलेला कचरा, राडा-रोडा-डेब्रीज हटवायचे आहेत. यात आपल्या सर्वांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासन सज्ज राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे


“स्वच्छता ही सवय आहे. आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगिकारायची आहे. त्याला संस्काराचे रूप द्यायचे आहे. या अभियानानंतर आपल्याला १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही देखील यशस्वी करायची आहे. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात आपल्या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून द्याल. चला महाराष्ट्र कचरा मुक्त करूया. स्वच्छ, सुंदर करूया. आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालूया. स्वच्छतेचा जागर करूया,” असेही मुख्यमंत्र्यानी आवाहन केले आहे


इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका - एकनाथ शिंदे


मुंबई, दि. २९: इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईल, केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा बलुतेदारांना लाभ मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.


सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास वर्ग तसेच भटके- विमुक्त समाजातील विविध संघटनांसमवेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, परिणय फुके, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


सुमारे तीन चास चाललेल्या बैठकीत इतर मागासवर्ग, भटके-विमुक्त, बारा बलुतेदार आदी समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे मांडले.


कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी करण्याची शासनाची भूमिका नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, मराठा समाजाचे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळवून देताना इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भात निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. राज्य शासन इतर मागास, भटक्या विमुक्त समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. 


राज्यातील 'सारथी', 'बार्टी', 'महाज्योती', 'टीआरटीआय' या संस्थांना निधी देताना कुठलाही भेदभाव होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही देतानाच भटक्या विमुक्तांच्या विविध प्रश्नांबाबत स्वतंत्रपणे बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


 इतर मागास समाजातील विद्यार्थ्य़ांसाठी ७२ वसतीगृहे तातडीने सुरू करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ देताना नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र असल्यास आठ लाखाच्या मर्यादेच्या प्रमाणपत्राची अट मागे घेण्यासंदर्भात तपासणी करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.


इतर मागास समाजासाठी ४ हजार कोटी रुपयांच्या योजना- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


राज्य शासनाच्या माध्यमातून इतर मागास समाजासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

केंद्र शासनाने ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून वैद्यकीय प्रवेशामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याचा निर्णयही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकार इतर मागास समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


भटक्या विमुक्त समाजाला भरघोस निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

राज्यातील भटक्या विमुक्त समाजाला आणि त्यातील दुर्लक्षित घटकांना भरघोस निधी देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. 

कोणत्याही घटकाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे सांगतानाच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय यांना निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही श्री. पवार यांनी सांगितले.


यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांच्यासह श्री. शेंडगे, श्री.तडस, डॉ. तायवाडे, श्री. बावकर, श्री. पडळकर, लक्ष्मणराव गायकवाड, पल्लवी रेणके, मंगेश ससाणे, विश्वनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 


बैठकीस राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, सचिन राजुरकर, पुरुषोत्तम प. शहाणे (पाटील), शरद वानखेडे, सुभाष घाटे, नरेश बरडे, शकील पटेल, दिनेश चोखारे, प्रकाश भगरथ, भालचंद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात गणरायाला निरोप

विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव

 मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ

 शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 यांच्याकडून पुष्पवृष्टी




मुंबई, दि. २८ - अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” च्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला.

पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटनमंत्री गिरीश महाजन, खासदार सुनील तटकरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंडपात आगमनापूर्वी सुवासिनींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांचे ओवाळून औक्षण केले. तसेच 
आयुक्त डॉ. चहल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
 
गिरगाव चौपाटीवर आज सायंकाळपासून भाविकांचा जनसागर जमला होता. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. 



बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईत विविध ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. मान्यवरांनी यावेळी उपस्थित असलेल्या विविध देशांच्या दूतावासाच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

देश-विदेशातील पर्यटकांना गणेश विसर्जन सोहळ्याचे दर्शन घडविण्यासाठी पर्यटन विभागाने आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाअंतर्गत उभारलेल्या विशेष 'गणेश दर्शन' गॅलरीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी भेट दिली. हा सोहळा अनुभवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या विदेशी पर्यटकांशी संवाद साधला. पोलीस दलाच्या मंडपालाही भेट देऊन त्यांनी तेथून गणेश भक्तांना अभिवादन केले.

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

 मौजे सुकेणे विद्यालयात

 गणरायांना भावपूर्ण निरोप

 विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप



मौजे सुकेणे विद्यालयात गणरायांना भावपूर्ण निरोपाप्रसंगी आरती करताना संस्थेचे उपसभापती डी बी मोगल, प्राचार्य रायभान दवंगे सेवक व विद्यार्थी 



कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २७ - मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात  नवव्या दिवशी गणरायांना कलामंचच्या मिरवणुकीसह भावपूर्ण निरोप देण्यात आला  सुरुवातीला मविप्र संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल, प्राचार्य रायभान दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे यांच्यासह सर्व विद्यार्थी व सेवकांनी गणरायाची आरती केली व उत्साहपूर्ण वातावरणात गणरायांना निरोप देण्यात आला सुरुवातीला विद्यालयातील सर्व शिक्षकांनी निधीचे संकलन करत  बालवाडीच्या  विद्यार्थ्यांपासून ते ज्युनिअर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले शिस्तबद्ध रीतीने दोन हजार विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे स्नेहभोजन देण्यात आले .

शालेय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप


दुपारी चार वाजता संगीत मंचच्या पथकाच्या सहाय्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला या मिरवणुकीत ९ वीच्या सर्व मुला-मुलींनी सहभागी होत गणरायांना घोषणा पूर्ण वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला याप्रसंगी प्राचार्य दवंगे उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, संगीत शिक्षक रामेश्वर धोंगडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाने परिश्रम घेतले

 ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने

 भारावले विदेशी पाहुणे !

३० हून अधिक देशांच्या वाणिज्यदूत, मान्यवरांची उपस्थिती




मुंबई, दि. २७ :- ‘गणपती बाप्पा मोरया' चा जयघोषाचा निनाद, श्री गणेशांचे उत्सवाच्या निमित्ताने सजलेले रुप आणि आरती-मंत्रोच्चार अशा भारावलेल्या भक्तीपूर्ण वातावरणात विविध देशातील पाहुण्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी प्रतिष्ठापित श्री गणेशांचे मनोभावे दर्शन घेतले. मुंबईतील विविध देशांच्या वाणिज्य दूतावासांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर हे ते विदेशी पाहुणे होते. यात रशियाच्या सेंट पीटसबर्गचे उपप्रांतपाल व्लादिमीर क्याजिनीन यांच्यासह तब्बल ३० हून अधिक देशातील विदेशी पाहुण्यांचा समावेश होता. 



अफगणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बहारिन बेलारूस, फिनलँड, हंगेरी, इस्त्रायल, जपान, कोरिया, मॉरिशस, पोलंड, सिंगापूर, स्पेन, टर्की, बांग्लादेश, ग्रेट-ब्रिटन, चीन, इराण, आर्यलंड, इटली, रशिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिरात, व्हिएतनाम, युगांडा, कोलंबिया, केनिया, युक्रेन या देशांच्या वाणिज्य दूतावास प्रमुख, वरिष्ठ अधिकारी वर्षा शासकीय निवासस्थानी आवर्जून भेट दिली. श्री गणेश दर्शनानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले. त्यांच्याशी दिलखुलास संवादही साधला. याच दरम्यान इर्शाळवाडीतील मुलांच्या हस्ते आरतीही करण्यात आली. या मुलांच्या अनुषंगाने माहिती घेतानाच, या विदेशी पाहुण्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संवेदनशीलतेलाही दाद दिली. 


श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतानाच या सर्व विदेशी पाहुणे मंडळींनी श्री गणेश पूजाविधीची आवर्जून माहिती घेतली. यानिमित्ताने वर्षा करण्यात आलेले स्वागत आणि भक्तीपूर्ण, उत्साही वातावरण याबाबतही या विदेशी पाहुण्यांनी आनंद आणि समाधानाच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या.

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

 स्वच्छता अभियानाला ‘लोकचळवळीचे स्वरूप मिळावे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


जीवन केशरी मराठी वृत्तसेवा: 

राज्यात १ ऑक्टोबर रोजी राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेसाठी एक तारीख - एक तास’ उपक्रमाच्या आयोजनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. ‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि नगर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे. स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन करतानाच राज्यात दि. १५ डिसेंबर २०२३ पर्यंत ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ राबविण्यात येणार असून लोकसहभागातून त्या स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. 


या अभियानासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. वर्षभरापूर्वी राज्यात ‘स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-२’ चा शुभारंभ केला. महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा हे आपलं उद्दिष्ट्य आहे. स्वच्छतेच्या मंत्राची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाने दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या काळात स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात हा उपक्रम यशस्वी करायचा असून त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 


महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीच्या बाहेरचा भागात नेहमी कचऱ्याचे ढीग, डेब्रिज टाकलेले असते. अशा महापालिका हद्दीबाहेरच्या जागा शोधून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिम राबवावी त्यासाठी मुख्य सचिवांनी आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान महत्वाचे आहे. स्वच्छता फक्त कागदावर ठेऊ नका. प्रत्यक्ष फिल्डवर त्याचे काम दिसले पाहिजे. या उपक्रमात आपण १ ऑक्टोबरला आपापल्या गावात, शहरात, प्रत्येक वार्डात, प्रत्येक क्षेत्रात सकाळी १० वाजेपासून स्वच्छता मोहीम राबवावी. प्रत्येक वॉर्डात दोन ठिकाणी आणि ग्रामपंचायतीत एका ठिकाणी मोहीम राबविताना त्या त्या भागातील सर्व नागरिकांना सहभागी करून घ्यावे, जिथे खरोखरच कचरा आहे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले आहे, अशा जागा शोधून काढा, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.


अभियानांतर्गत सफाई मित्र, सुरक्षा शिबिरे आयोजित करून स्वच्छतेची गरज त्याची फायदे याचे महत्व पटवून द्या. एक तासाचे हे अभियान प्रतिकात्मक असून श्रमदानासाठी नागरिकांना सहभागी करून घ्यावे पण आपल्याला प्रशासन म्हणून स्वच्छतेचे काम दररोजच करायचे आहे असे सांगत अभियानानंतर १५ डिसेंबर २०२३ पर्यंत ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ यशस्वी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक कायम राहण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने ‘मिशन मोड’वर काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

 महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तट रक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे




भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या सागरी भागातील सुरक्षा उपाययोजनांसाठी महाराष्ट्र शासनाकडून भारतीय तटरक्षक दलाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यानी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. 

या भेटीत श्री. बाडकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना महाराष्ट्रातील सागरी भागातील सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी येथील हवाई सुरक्षा सुविधांचा आढावा सादर केला. विशेषतः वरळी येथील सुविधांचे तात्काळ अद्ययावतीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वरळीसह, राज्यातील सागरी परिक्षेत्रात तट रक्षक दलासाठी आवश्यक अशा सोयी-सुविधा उभारणी करिता महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

सोमवार, २५ सप्टेंबर, २०२३

 मौजे सुकेणे महाविद्यालयात रासेयो स्थापना दिन

मौजे सुकेणे ता निफाड येथील कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे, विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे, सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी प्रतिनिधी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २५- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला अध्यक्षस्थानी ज्यु कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे होते सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमा पूजन करण्यात आले प्रास्ताविकातून प्रा दिनकर रसाळ यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा करण्याचा हेतू विशद केला यावेळी कलामंचच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय सेवा योजना गीत सादर केले याप्रसंगी विद्यार्थिनी कु तेजस्विनी काळोगे,कु साक्षी गायकवाड,कु श्रद्धा जाधव ,कु पूजा तिडके तर शिक्षकांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा राजेंद्र धनवटे यांनी मनोगत व्यक्त केले प्राचार्य दवंगे यांनी सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा सचिन भंडारे ,विजय मोगल, सुनील आहेर, शुभांगी गांगुर्डे, माहेश्वरी मत्सागर, पूजा बोराडे, कविता गीते ,राहुल गीते ,महेश निकम,चिंधू गांगुर्डे यांनी प्रयत्न केले सूत्रसंचालन प्रा दिनकर रसाळ यांनी तर आभार प्रा ज्ञानेश्वर वाघ यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

 

ठाण्याचा रुद्रांक्ष पाटील आशियाई नेमबाजी स्पर्धेत चमकला


आशियाई क्रीडा स्पर्धेत एअर रायफल्समध्ये भारताला पहिले सुवर्णपदक


रूद्रांक्ष बाळासाहेब पाटील 



आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या तिघांचे विशेष कौतुक केले आहे.

रूद्रांक्ष पाटील, दिव्यांश सिंह पनवर , ऐश्वर्य सिंह तौमर 


चीनमधील फुयांग (हांगजोऊ) येथे सुरु असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या संघाने १० मीटर एअर रायफल्स प्रकारात चमकदार कामगिरी केली आहे. यात रुद्रांक्ष, ऐश्वर्य आणि दिव्यांश यांनी सुरूवातीपासूनच कामगिरीत सातत्य ठेवून गुणांची कमाई करीत, संघाला सुवर्ण पदक मिळवून दिले आहे. रुद्रांक्ष पाटील हा ठाण्याचा खेळाडू आहे. त्याच्या नेमबाजीतील नैपुण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाठबळ दिले आहे.  


मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी या तिघांचेही विशेष कौतुक म्हटले आहे की, भारताने नेहमीच आशियाई क्रीडा स्पर्धेवर वर्चस्व राखले आहे. यंदाच्या या स्पर्धेत सुरूवातच या तिघांनी नेमबाजीत सुवर्ण पदकाचा वेध घेऊन केली आहे. यासाठी या खेळाडुंचे, त्यांच्या प्रशिक्षक-मार्गदर्शकांचे आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या कुटुबियांचे देखील कौतुक करावे लागेल. अशा जिद्दी आणि मेहनती खेळाडुंच्या कामागिरीच्या जोरावरच भारताची यंदाच्या या स्पर्धेतील कामागिरी अशीच दिमाखदार राहील आणि आपला भारत या स्पर्धेत पदक तालिकेत अव्वल राहील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे. या यशस्वीतेसाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पर्धेत सहभागी भारतीय खेळाडुंच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.



रविवार, २४ सप्टेंबर, २०२३

  

 मौजे सुकेणे विद्यालयात आजी आजोबा दिन

आजी आजोबा दिन काळाची गरज - अर्जुन तात्या बोराडे

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात आजी आजोबा दिन कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे व्यासपीठावर प्राचार्य रायभान दवंगे व आदी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २४- बदलत्या संस्कृतीच्या काळात छोट्या कुटुंबांचे महत्त्व वाढत चालले असले तरी मुलांना खऱ्या अर्थाने संस्कार करण्याचे काम आजी-आजोबाच करतात त्यामुळे मुलांवर चांगले संस्कार घडून येतात असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन तात्या बोराडे यांनी केले ते मौजे सुकेणे येथील कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयात आजी आजोबा दिन कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते ज्या घरामध्ये आजी आजोबा आहे त्या घरातीलच मुले संस्कारक्षमच घडतात त्यामुळे आजी आजोबा दिन साजरा होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते तर व्यासपीठावर आजी वत्सलाबाई वाकचौरे, मंगला खोडे, लता सगर, सुनंदा पगार, मेघा शेजवळ, विठाबाई धुळे तर आजोबा मधुकर खोडे, रहीम पठाण, निवृत्ती धुळे, यादव सोनवणे, एकनाथ हळदे, बाळासाहेब निरभवणे, भास्कर गांगुर्डे आदी उपस्थित होते सुरुवातीला उपस्थित आजी आजोबांच्या हस्ते गणपतीची आरती घेण्यात आली यावेळी उपस्थित आजोबा व आजींनी मनोगत व्यक्त करत शासन व शाळांच्या या स्तुत्य उपक्रमाची गरज असल्याचे प्रतिपादन केले यावेळी उपस्थित आजी आजोबांचा शालेय प्रशासनासह त्यांच्या नातवांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी उपस्थित आजी आजोबांचे स्वागत करत

 मुलांचे पहिले व शेवटचे खरे मित्र आजी आजोबाच असतात ज्या घरात आजी आजोबा आहे ते नातवंडे भाग्यवान असल्याचे प्रतिपादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंद ताकाटे यांनी केले कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे यांच्या सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते 


शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३

 अमित शाह यांचे मुंबईत आगमन ; वर्षा बंगल्यावर गणपती दर्शन 

केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांचे स्वागत करतांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 




मुंबई:- केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे एकदिवसीय दौऱ्यासाठी आज दुपारी मुंबई विमानतळावर आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. शाह यांचे स्वागत केले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनीही श्री. शाह यांचे स्वागत केले.

 

अमित शाह यांचे वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पांचे दर्शन 

यानंतर मा.श्री. अमित शाह मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सपत्निक भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. शाह यांचे श्री गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनोज कोटक आणि पूनम महाजन, आमदार आशिष शेलार आदी उपस्थित होते.

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३

 नागरीकांच्या झोपा उडवून पालिका झोपेत ?



नाशिक:- मागील काही दिवसांपासून रविवार कारंजा येथील गोरेराम लेन ह्या परिसरात सकाळचा पाणीपुरवठा हा वेळेवर होत नाही. याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या संबंधित पाणीपुरवठा विभागाचे श्री. जगदीश सुर्यवंशी यांस नागरिकांची समस्या सांगण्यात आली होती परंतु ती तक्रार सांगून देखील पुन्हा पुन्हा संबंधित घटना घडत आहेत. दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी सुध्दा सकाळचा पाणीपुरवठा खंडित होता जो सुर्यवंशी यांना फोन केल्यानंतर सुरू करण्यात आला यानंतर दि. २१ सप्टेंबर २०२३ रोजी सुध्दा सकाळचा पाणीपुरवठा खंडित होता. जो फोन केल्यानंतर ६:१८ वा. आले होते. दि. २२ सप्टेंबर रोजी सुध्दा पाणीपुरवठा हा ६:१५ रोजी सरु झाला. नाशिक महानगरपालिका आपल्या कामात किती प्रमाणात दक्षता बाळगते हे सिद्ध होते. नाशिक शहराचा पाणीपुरवठा करण्याचा जो निर्धारीत वेळ आहे त्या वेळेतच पाणीपुरवठा सुरळीतरीत्या करावा. संबंधित घटनेमुळे परिसरातील सर्व नागरिकांना , गृहिणींना, विद्यार्थ्यांना अनेक प्रकारच्या समस्या भेडसावत आहेत. ह्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संतप्त आहेत.



गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३

प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश


मुंबई, दि. २१ – राज्यातील जलसंपदा विभागाचे अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी  नाबार्डसह इतर वित्तीय संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारून सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत, राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. 


सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी १५ हजार कोटी रुपयांच्या कर्ज उभारणीच्या विषयावर चर्चा करण्यात आली.  बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ‘मित्र’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांच्यासह नाबार्डचे व्यवस्थापकीय संचालक शाहजी केव्ही, एलआयसीचे श्री. पांडे आणि एसबीआय कॅपिटलचे कार्यकारी उपाध्यक्ष राजन गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. 


राज्यातील निवडक ८९ लघु सिंचन प्रकल्प अपूर्णावस्थेत असून ते पूर्ण करण्याकरिता ७ हजार ३५१ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हे प्रकल्प एका वर्षात पूर्ण झाल्यास सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अतिरिक्त निधी उभारण्यासाठी वित्त, नियोजन, जलसंपदा, लाभक्षेत्र विकास यांचे अपर मुख्य सचिव आणि ‘मित्र’ चे सीईओ यांनी एकत्रित निर्णय घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या. 


ज्या प्रकल्पांसाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक भूसंपादन झाले आणि ज्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद नाही त्याच प्रकल्पांच्या कामांसाठी अतिरिक्त निधी उभारण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. नगरविकास विभागाच्या नगरोत्थान योजनेमधील आणि अमृत योजनेतील १४४ प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ४ हजार ६८६ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे, त्यादृष्टीने देखील नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. या अपूर्ण प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यासाठी निधी उभारण्यासाठी शासनाकडून सर्वेतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली. 

महाराष्ट्र सिंचन आधुनिकीकरण कार्यक्रमातून कालव्यांची कामे केली तर पैशांची बचत होण्याबरोबरच तातडीने कामे पूर्ण होतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

बुधवार, २० सप्टेंबर, २०२३

 प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व्हाटस्अपद्वारे नागरीकांच्या सेवेत ! 

 

भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी सुध्दा नागरीकांच्या संपर्कात व्हाटस्अपद्वारे दाखल झाले आहेत. 



 
महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, कर्नाटका, गुजरात , दिल्ली , तेलंगणा , पंजाब राज्यांचे मुख्यमंत्री. 


सध्याच्या युगात आपण इंस्टाग्राम , व्हाटस्अप, फेसबुक ह्यांच्याशिवाय आयुष्याचा विचारही करू शकत नाही. सध्या व्हाटस्अपने एक भन्नाट फीचर लॉन्च केले आहे. आता स्टेटस ऐवजी अपडेट चे चिन्ह दिसणार असून त्यात स्टेटस व सेलिब्रिटींची चॅनेल दिसणार आहेत जेणेकरून ते जनतेशी आपला सुसंवाद कायम राखू शकतील. ह्याच फीचरद्वारे भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांचे सुध्दा व्हाटस्अप ला चॅनेल सरू झाले आहे . यामुळे शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात अधिक बळ मिळणार आहे ‌. व्हाटस्अप अपडेट मध्ये फाईंड चॅनेलचे पर्याय दिसेल तिथे CMO Maharashtra लिहिल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे प्रोफाइल दिसेल . त्याला फोलो केल्यानंतर मुख्यमंत्री नागरिकांशी संवाद लागतील. यासाठी सर्वात पहिले आपले व्हाटस्अप अपडेट करून घ्यावे. 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व्हाटस्अपद्वारे नागरीकांच्या सेवेत दाखल 


राज्य सरकारच्या कंत्राटीकरणाच्या निर्णयाविरोधात कामगार कर्मचारी संघटना व कृषी समितीचे राज्यभर आंदोलन ! 

कॉ. राजू देसले 


  ६ सप्टेंबर रोजी राज्य सरकारने शासनाच्या सर्व विभागात, शासकीय विभागात, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादीमध्ये बाह्य स्त्रोताद्वारे नऊ एजन्सी मार्फत कंत्राटी कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अशी मागणी आयटक सह कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने निवेदनाद्वारे मा. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस व मा.अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे. तसेच या निर्णयाच्या विरोधात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या सर्व घटक संघटना राज्यभर २१ सप्टेंबर २०२३ पासून निषेध निदर्शने करणार आहेत.राज्यातील २००० पेक्षा जास्त युनियन स्वतंत्रपणे मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सदरचा निर्णय मागे घेण्याची मागणी करणार आहेत.तसेच गणेश उत्सवानंतर मुंबईमध्ये राज्यातील सर्व कामगार संघटनांची संयुक्त परिषद घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल. सर्व राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या कंत्राटीकरणाच्या निर्णयाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी. जे पक्ष कंत्राटीकरणालापाठींबा देतील त्यांना येत्या निवडणुकीत पराभव करण्यात येईल अशी तीव्र भावना व्यक्त करण्यात आली. आहे. तसेच विद्यार्थी, युवक व स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांनीही या निर्णयाला विरोध करावा असे आवाहन कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.सदर कंत्राटीकरणाचा निर्णय भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्काचे उल्लंघन करणारा व आरक्षण विरोधी असल्याने मुंबई उच्च न्यायालयात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीचे वतीने पेटिशन  दाखल करण्यात येणार आहे.सोबत माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना देण्यात आलेले निवेदन जोडले आहे.

निवेदन :- 

 समन्वयक

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती

कामगार कर्मचारी संघटना कृती समिती 

महाराष्ट्र राज्य.

पत्ता:  आयटक कामगार केंद्र , २५अ  मेघदुत शॉपिंग सेंटर नाशिक – ४२२००८


  दि. १९/०९/२०२३.                                      

‌‌प्रति,                                                                        

मा. एकनाथराव शिंदे,                             मा. देवेंद्र फडणवीस,                      मा. अजित दादा पवार,                               

 मुख्यमंत्री,             उपमुख्यमंत्री,                              उपमुख्यमंत्री,                                                                                

महाराष्ट्र राज्य,                                        महाराष्ट्र राज्य.            महाराष्ट्र राज्य.

                                                                                                                                                        मा. सुरेशभाऊ खाडे,                                                                     

कामगार मंत्री,                                                               

महाराष्ट्र राज्य.                                   

   

महोदय,                                                            

१. शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खणी कर्म विभागाने ६ सप्टेंबर २०२३ रोजी एका शासन निर्णयाद्वारे सरकारच्या सर्व विभाग, नीम शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे इत्यादी मध्ये बाह्य यंत्रणेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार एजन्सीचे नवीन पॅनल नियुक्त करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. सदर निर्णयाद्वारे अति कुशल,कुशल, अर्ध कुशल, अकुशल अशा सर्व प्रकारचे मनुष्यबळ पॅनल मधील नऊ एजन्सी मार्फत पुरविले जाणार आहे. सदर पुरवठादारांच्या सेवा घेणे राज्य शासनाचे शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम व इतर आस्थापना यांना बंधनकारक करण्यात आले आहे. पॅनल मधील पुरवठादार एजन्सी मार्फत बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना किती मानधन /वेतन मिळेल हेही या शासन निर्णययामध्ये निश्चित करण्यात आले आहे. 


२. या निर्णयानुसार सेवा पुरवठादार एजन्सीला १५% टक्के एवढी रक्कम सेवाशुल्क म्हणून देय राहील. तसेच १% टक्का उप कर असंघटित कामगार मंडळाकडे वर्ग केला जाईल व १% टक्का संकीर्ण खर्चापोटी खर्च जमा करण्यात येईल. त्यामधून मनुष्यबळास लागणारे साधनसामुग्री, संगणक, प्रिंटर, स्टेशनरी, गणवेश, प्रशिक्षण, बदली कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात येईल. 


३. याप्रकारे १७% टक्के रक्कम वगळून उर्वरित रक्कम प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष वेतन /सेवा स्वरूपात बाह्य यंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचारी यांना दिली जाईल. पाच वर्ष या काळात मनुष्यबळाच्या दरामध्ये कोणतीही वाढ होणार नाही.


४. या शासन निर्णयानुसार अति कुशल वर्गवारीत प्रोजेक्ट ऑफिसर, मॅनेजर, प्रोजेक्ट कन्सल्टंट, सीनियर इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, मार्केटिंग, एक्सपर्ट ट्रेनिंग मॅनेजर, रिसर्च असोसिएट डिस्टिक यांचा समावेश असून त्यांची शैक्षणिक अर्हता नमूद करण्यात आले आहे. व अति कुशल कामासाठी रु.४० हजार ते १ लाख २० हजार पर्यंतचे मानधन वेतन निश्चित केले आहे. कुशल मनुष्यबळासाठी २५ हजार ते ६० हजार वेतन निश्चित केले आहे. अर्धकुशल मनुष्यबळासाठी ३० ते ३२ हजार रुपये वेतन निश्चित केले आहे. 


अकुशल कर्मचाऱ्यांसाठी २५ते २७ हजार ५०० रुपये वेतन निश्चित केले आहे. या वेतनाच्या रकमेतून १५ टक्के सेवाशुल्क, १% टक्का मिसलेनियस, १% टक्का सेस वगळून ८३% टक्के रक्कम मनुष्यबळाच्या वेतनासाठी शिल्लक राहते. त्यामधून १३% टक्के प्रॉव्हिडंट फंडाचा मालकाचा सहभाग, तसेच मालकाचा ईएसआयसी ३.२५% चा सहभाग कपात होईल. म्हणजेच वर्णन केलेल्या रकमेपैकी ६९.५१% हे मनुष्यबळाचे वेतन असेल. 


यातून कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंडाचे १२% टक्के व ईएसआयसी चे पॉईंट ०.७५% टक्के कपात केल्यास कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये ६०.६५% टक्के रक्कम होईल. 


याचाच अर्थ अकुशल कामगाराला जरी २५ हजार रुपये वेतन दर्शविले असले तरी त्यापैकी फक्त ६०% टक्के रक्कम त्याच्या हातात मिळेल, म्हणजे १५ हजार रुपये मिळतील. याच प्रमाणात अर्धकुशल, कुशल व अतिकुशल कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये कपात होईल


आश्चर्यकारक हे आहे कि, प्रस्तावित केलेले वेतन, किमान वेतन कायद्यानुसार सध्या देय असलेल्या किमान वेतनापेक्षाही कमी आहे.


५. याबाबत कामगार खात्याने यापूर्वी काढलेल्या शासन निर्णयामध्ये बदल केला आहे व यापूर्वी वर नमूद केलेल्या मनुष्यबळासाठी जे वेतन दाखवले होते त्यामध्ये सुमारे ३०% टक्केची कपात केली आहे. विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा या उद्देशाने असे करत असल्याचे समर्थन केले आहे.

६. मुळातच हे वेतन निश्चित करताना कुठलाही शास्त्रीय आधार घेतलेला नाही व पंधरावी भारतीय श्रम परिषद,सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे यानुसार किमान वेतन निश्चित केल्यास आज ते दरमहा ३० हजार रुपये करावयाला लागेल. विशेष म्हणजे चार श्रमसंहिता पैकी वेतन विषयक श्रमसंहितेच्या नियमांतर्गत जे सूत्र किमान वेतन निश्चित करण्यासाठी प्रस्तावित केले आहे त्याचाही विचार केलेला दिसून येत नाही. फक्त शासनाचा खर्च कमी करायचा ह्या एकाच उद्देशाने मन मानेल त्या पद्धतीने वेतन निश्चित करण्यात आले आहे.

७. वर दर्शवलेल्या वेतनातून सुमारे ४०% टक्के रक्कम ही विविध कारणास्तव कपात होणार आहे. मग उरलेल्या रक्कमेमध्ये अति कुशल असो किंवा अकुशल असो या कर्मचाऱ्यांनी जगायचे कसे? हा प्रश्न निर्माण होतो. 

८. सर्वोच्च न्यायालयाने समान कामाला समान वेतन व लाभ दिले पाहिजेत असा स्पष्ट आदेश दिलेला आहे. बाह्य यंत्रणेद्वारे  जी पदे भरली जाणार आहेत तशाच व त्याच पदावर सध्या काम करणारे कर्मचाऱ्यांचे वेतन व लाभ आणि या निर्णयात प्रस्तावित केलेले वेतन याच्यामध्ये जमीन आसमान चा फरक आहे. असे करून महाराष्ट्र शासन सर्वोच्च न्यायालयाच्या समान कामाला समान वेतन व लाभ दिले पाहिजे या निर्णयाचेही उल्लंघन करीत आहे.

९. कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी कटिबद्ध असलेल्या कामगार विभागाने अशा पद्धतीचा शासन निर्णय करावा हेच या विभागाचे चारित्र्य दर्शवते.

१०. विशेष म्हणजे या शासन निर्णयामध्ये कर्मचाऱ्यांच्या फक्त प्रॉव्हिडंट फंड आणि ईएसआयसीचा विचार केला आहे. वार्षिक बोनस, महागाई भत्ता, रजा, ग्रॅच्युइटी, नुकसान भरपाई याबाबत कुठलाही उल्लेख किंवा याबाबतची कुठलीही तरतूद या शासन निर्णयात नाही. 


मग हे सर्व कायदे रद्द केले असे समजायचे का? बोनसही बंद केला का? आणि महागाई भत्ता ही बंद करण्यात आला आहे काय ? विना रजा त्यांनी काम करावे असे शासनाला अपेक्षित आहे काय? असे असेल तर ते तर आज अस्तित्वात असलेल्या सर्वच कामगार कायद्याचे सर्रास उल्लंघन आहे.


११. पाच वर्षाकरिता या दरामध्ये कुठलीही वाढ देण्यात येणार नाही असे स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ याच वेतनावर/ मानधनावर कर्मचाऱ्यांनी पाच वर्षे काम करावे असा होतो.  यापुढे महागाई कुठल्याही परिस्थितीत होणार नाही असे समजायचे काय? आणि मग महागाई झाल्यास या कर्मचाऱ्यांना संरक्षण कुठले या प्रश्नाचे उत्तरही शासन निर्णयात नाही.

१२. विशेष म्हणजे सरकारच्या सर्व भागांमध्ये निम शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे अशा सर्व आस्थापनांमध्ये या नऊ एजन्सी मार्फतच बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी भरती करावी असा दंडक घालण्यात आला आहे. राज्य सरकारने आता संपूर्ण कंत्राटीकरणाचे धोरण स्वीकारले आहे असा याचा अर्थ होतो. 

१३. हे करत असतानाही कंत्राटी कामगार नियमन व  निर्मूलन कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. नियमित स्वरूपाच्या कामासाठी कंत्राटी कर्मचारी नेमता येत नाहीत अशी कायद्यात तरतूद असतानाही त्याचे व अन्य तरतुदीचे उल्लंघन केले जात आहे. त्याचबरोबर स्थायी आदर्श स्थायी आदेशाचे उल्लंघन केले जात आहे.

१४. आज महाराष्ट्रामध्ये दोन लाखापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. सध्याच्या घटनात्मक तरतुदीनुसार या विभागामध्ये आरक्षण लागू आहे. परंतु या शासन निर्णयामध्ये आरक्षणा बद्दल कुठलीही तरतूद केलेली नाही. मग महाराष्ट्र शासनाने आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे काय? आणि असे असल्यास हा घटनात्मक तरतुदीचा भंग होत नाही का? यातून या शासनाचा आरक्षण विरोधी मनुवादी वृत्ती स्पष्ट दिसत आहे.

१५. आज राज्यामध्ये हजारो कॉलेजेस मधून लाखोच्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. खाजगीकरणाच्या काळामध्ये शिक्षणावर पालकांना प्रचंड खर्च करावा लागतो. विद्यार्थी युवकांना जीवघेण्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत डिग्री घेऊन व स्पर्धा परीक्षेची तयारी करून या विद्यार्थी व युवकांना कंत्राटी पद्धतीने नेमणूक देणे अत्यंत अन्यायकारक व अमानवी आहे.

१६. म्हणून हा शासन निर्णय बेरोजगार तरुण-तरुणींच्या विरोधातला, कामगार कर्मचाऱ्यांच्या विरोधातला, आत्तापर्यंत अस्तित्वात असलेले अनेक कामगार कायद्याचे उल्लंघन करणारा, विविध लेबर कॉन्फरन्स मध्ये केलेल्या शिफारशीचे अवमूल्यन करणारा, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे उल्लंघन करणारा व घटनेतील आरक्षणाविषयीच्या तरतुदीचा भंग करणारा आहे.  योजना कर्मचारी ना शासकीय सेवेत कायम करा आणि म्हणून हा निर्णय ताबडतोब रद्द केला पाहिजे अशी  मागणी

आयटक,कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची मागणी आहे.


सरकारने हा निर्णय रद्द न केल्यास राज्यातील सर्व कामगार कर्मचारी संघटना एकजुटीने याविरुद्ध तीव्र आंदोलन करतील असा इशारा आयटक सह कामगार कर्मचारी संघटना कृती समिती आम्ही या निवेदनाद्वारे देत आहोत. 


आपले नम्र,

कॉ. राजू देसले समन्वयक

कामगार कर्मचारी संघटना कृती समिती महाराष्ट्र राज्य. तथा आयटक राज्य सचिव महाराष्ट्र, व्ही डी धनवटे नाशिक जिल्हा अध्यक्ष, दत्तु तुपे जील्हासचिव, दत्तात्रय  गायधनी,  अनिल बीचकुल,   सखाराम दुर्गुडे, भीमा पाटील, अरूण म्हस्के

 मौजे सुकेणे विद्यालयात कर्मवीर गणपत दादा मोरे यांना अभिवादन

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या प्रतिमा पूजन प्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे, मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे व आदी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २०- मविप्र संचलित कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, ज्यु कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे, अभिनवच्या मुख्याध्यापिका सुवर्णा ठाकरे आदींच्या हस्ते कर्मवीर मोरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक प्रा सचिन भंडारे यांनी केले यावेळी विद्यार्थी कु कल्पेश हळदे, कु ज्ञानेश्वरी शेवकर यांनी तर शिक्षकांच्या वतीने भारत मोगल यांनी कर्मवीर गणपत दादा मोरे यांच्या कार्याची ओळख करून दिली. अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी संस्थेच्या आद्य संस्थापकांनी संस्थेचा पाया रचला आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले असून आपण या संस्थेचे घटक आहोत याचा सार्थ अभिमान आपणास हवा असे प्रतिपादन केले सूत्रसंचालन विलास डेर्ले, यांनी तर आभार रामेश्वर धोंगडे यांनी मानले कार्यक्रमासाठी प्राचार्य दवंगे यांच्यासह चिंधु गांगुर्डे, भास्कर गांगुर्डे, संजय पवार, एकनाथ हळदे, सुनील टर्ले, तुषार हळदे, साहेबराव आहेर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

 

सोमवार, १८ सप्टेंबर, २०२३

 एकीकडे शासन आपल्या दारी , दुसरीकडे महिलांना भिकारी  बनविण्याची तयारी ?

प्रशासन महिलांचे वेतन देण्यात असमर्थ; पालिकेची बाब क्लेषदायक ! 



नाशिक:- नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या अंतर्गत अंगणवाडी हा प्रकल्प सुरू आहे व ह्या‌ प्रकल्पता सुमारे ६००-७०० त्यापुढे स्त्रिया काम करतात. काही दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत अंगणवाडी सेविका व मदतनीस ह्यांना २०००/- मानधन वाढवून देण्याचा निर्णय महासभेत मंजूर करण्यात आला परंतु हा निर्णय फक्त कागदावरच आहे. नाशिक महानगरपालिकेने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सुमारे तीन महिन्यांचे मानधन थकीत ठेवले आहे. रक्षाबंधन, बैलपोळा ह्यांसारख्या सणाला सुध्दा पालिकेने महिलांकडे दुर्लक्ष केले. व गणेशोत्सव सारख्या मोठ्या सणातही दुर्लक्ष केले. सणांच्या एकदिवसीय आधी उशिरा फक्त एका महिन्याचे मानधन महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले. प्रशासन एकीकडे शासन आपल्या दारी राबविते व नंतर पैशांसाठी लोकांना भिकारी बनविण्यास मजबूर करते की काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाने ह्याबाबतीत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. मानधन वाढविण्याचे नाटक करून महिलांची दिशाभूल करणे त्यांना पैशांसाठी सतावणे हे प्रशासनाला शोभत नाही. नाशिक महानगरपालिकेकडून महिलांना मिळणारी रक्कम ही अतिशय तुटपुंज्या पद्धतीची आहे. व त्या रक्कमेसाठी जर अशी अवस्था असेल तर मग शासनाच्या त्या लाखों पगारावर काम करणाऱ्या व नियमित वेळेवर पगार मिळणाऱ्यांना हा त्रास का नाही ? असा प्रश्न नेहमीच सर्वांना भेडसावतो .

शनिवार, १६ सप्टेंबर, २०२३

 मौजे सुकेणे विद्यालयात शाडू मातीच्या गणपतीची कार्यशाळा

मौजे सुकेणे विद्यालयात शाडू मातीच्या गणपतीची कार्यशाळा घेण्यात आली त्याप्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे ,विद्यार्थी व शिक्षक


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता १६- मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात शाडू मातीच्या गणपती बनवण्याची कार्यशाळा पार पडली या कार्यशाळेत १०५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला याप्रसंगी उत्कृष्ट गणपती बनविणाऱ्या मोठ्या गटातून पूनम पवार ८ वी ड, ज्ञानेश्वरी विधाते १० वी ब, तर लहान गटात सार्थक कातकाडे ६ वी अ, सौरभ वाघचौरे ६ वी ब या पहिल्या दोन विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यावेळी प्राचार्य रायभान दवंगे यांनी शाडू मातीच्या गणपती कार्यशाळेचा हेतू विशद करून विद्यार्थ्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीची मूर्ती बाजारातून खरेदी न करता घरीच बनवलेल्या शाडू मातीच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी असे आवाहन केले शाडू मातीच्या गणपतीपुळे पर्यावरणाचे प्रदूषण होत नाही त्यामुळे समाजाने देखील याच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करावी याबाबत विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी असेही आवाहन केले ही कार्यशाळा कला शिक्षिका विशाखा वाघ, सविता कापडी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी व उपस्थित शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.


शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०२३

 मौजे सुकेणे विद्यालयात हिंदी दिन साजरा 

मौजे सुकेणे विद्यालयात हिंदी दिनानिमित्ताने प्राचार्य रायभान दवंगे व उपस्थित सेवक वृंद


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता १५ - मविप्र संचलित कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात हिंदी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे,पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, दत्तू पडोळ व उपस्थित हिंदी विषय शिक्षकांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले प्रास्ताविक श्रीम वंदना गोसावी यांनी केले याप्रसंगी विद्यार्थिनी कु अश्विनी भंडारे ,कु प्रतीक्षा पवार ,शिक्षिका श्रीम मेघा शेजवळ यांनी  हिंदी दिनाचे महत्त्व विशद केले तर प्राचार्य दवंगे यांनी हिंदी दिन साजरा करण्यामागचा हेतू विशद करून विद्यार्थ्यांनी हिंदी भाषा चांगल्या प्रकारे आत्मसात करावी असे आवाहन केले कार्यक्रमासाठी सर्व हिंदी विषय शिक्षकासह जेष्ठ शिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु समीक्षा गुरगुडे व शिवांजली गायकवाड हिने तर आभार श्रीम वर्षा कारे यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

 

जनता विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा 



नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे आज दि. १५ रोजी हिंदी व अभियंता दिन साजरा करण्यात आला. डॉ. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा केला जातो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. एस. डी. शिंदे होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली.  कु. तपस्या नारळे हिने हिंदी दिवसाविषयी वक्तृत्व केले . यानंतर शाळेत हिंदी दिनानिमित्त काव्यगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्यात श्रेया इंगळे - ८ वी ब, समृद्धी बोडके - ८ वी क  ,  प्रसाद भालेकर - ९ वी अ , नयन गाडेकर - १० वी ब , ज्ञानेश्वरी कर्चे - १० वी क ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या कविता कार्यक्रमात सादर केल्या यानंतर ९ वी मधील कु. स्वराज मांदळे ह्याने युकेलेले (एक चारतारी छोटे तंतूवाद्य ) चे उत्कृष्टरित्या सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद भालेकर ह्याने केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रसाद भालेकर, तपस्या नारळे, अनुष गोहिल , प्रिती जाधव, पायल राजपूत, गौरी जाधव इ. विद्यार्थ्यांनी मदत केली . याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. शिंदे , श्रीम. डोखळे, श्रीम. आगळे , श्रीम. पिंगळे, श्रीम. ठाकरे , श्रीम. गोवर्धने इ. सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.

बुधवार, १३ सप्टेंबर, २०२३

 मौजे सुकेणे विद्यालयाच्या 

वतीने पावसाळी वनभोजन 

सहलीचे आयोजन

 ऍग्रोफँब कंपनीला भेट देत क्षेत्रभेटीचाही लुटला आनंद

 मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयातील विद्यार्थी वनभोजनासाठी जाताना व महालक्ष्मी मंदिर परिसरात वृक्षारोपण करताना प्राचार्य रायभान दवंगे ,लक्ष्मण भंडारे, विलास भंडारे व आदी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता १३- मविप्र संचलित कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयाची पावसाळी एक दिवशीय वनभोजन सहलीचे कसबे सुकेणे येथील कुलस्वामिनी महालक्ष्मी माता मंदिर परिसरात प्राचार्य रायभान दवंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले यावेळी विद्यालयातील पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तीन किलोमीटर अंतर असलेल्या कसबे सुकेणे ते कोकणगाव रोडवरील श्री महालक्ष्मी माता मंदिर परिसरात निसर्गाच्या सानिध्यात जाऊन वनभोजन सहलीचा आनंद लुटला यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले विद्यालयाच्या वतीने श्री महालक्ष्मी माता ट्रस्टचे सदस्य लक्ष्मण भंडारे, विलास भंडारे, प्राचार्य दवंगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी या संपूर्ण परिसराची स्वच्छता करत येथून जवळ असलेल्या ऍग्रोफँब या कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या कंपनीला भेट देऊन भौगोलिक क्षेत्र भेटीचाही आनंद लुटला याप्रसंगी प्राचार्य दवंगे यांच्यासह, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, सहल प्रमुख दिलीप काळे, सांस्कृतिक कमिटी प्रमुख रामेश्वर धोंगडे ,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

 

सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

 शहरात दिवसाही पथदिवे

 सुरू !  प्रशासनाचे दुर्लक्ष. 


समर्थ ज्युस सेंटर , पेठे विद्यालय शेजारी , रविवार कारंजा जवळील पथदिवे दुपारी १:३० वाजता सरु होते .





२) पेठे  विद्यालय  समोरील पथदिपक 


नाशिक:- शहरात पथदिकांची समस्या नेहमीच नागरिकांना भेडसावत आली आहेत. कधीकधी रात्री पुर्णवेळ पथदीपक बंद असतो‌ व कधीतरी दिवसांचा लख्खं प्रकाश असताना‌ सुध्दा पथदीपक सकाळपासून संध्याकाळपर्यंत सरु राहतात व ह्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्यासारखे आहे. 
( छाया :- प्रसाद भालेकर) 



गुरुवार, ७ सप्टेंबर, २०२३

 घरकामगार मोलकरीणच्या मुलांना शालेय साहित्य मदत गरजेची -  कामगार उपायुक्त माळी



नाशिक : दि. ६ ऑगस्ट 2023 रोजी आयटक कामगार केंद्र नाशिक येथे घरकाम करणाऱ्या महिलांच्या मुलांना शालेय साहित्याचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन घरकाम मोलकरीण संघटना नाशिक (आयटक) तर्फे करण्यात आले होते.



दिवसेंदिवस मुलांचे शिक्षण महागडे होत असल्याने मध्यमवर्गीय हैराण आहेत अशा वेळी लोकांच्या घरी- धुनी भांडी करणाऱ्या महिलांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा असा असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा असतो. घरकाम करणाऱ्या महिलांचे आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. अशा परिस्थितीत शिकणाऱ्या सदर विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीस हातभार लावण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन नाशिक जिल्हा घरकाम मोलकरीण संघटना (आयटक)नाशिक तर्फे करण्यात आले. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभाग कामगार उपायुक्त मा. विकास माळी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना उद्देशून विकास माळी यांनी भाष्य केलें. प्रत्त्येक विद्यार्थ्याने जिद्द ठेवली पाहिजे. प्रत्येकाला जन्मतःच गुण नसतात, ते गुण आत्मसात कराव्या लागतात. व्यवहारीक नॉलेज प्रत्येकाला आल पाहिजे. त्यासाठी भरपूर अभ्यास करणं महत्वाचं आहे. शिक्षण घेणं महत्वाचं आहे. मुलांना काय बनायचं हे त्याच्या कला गुना वरून ठरवा. शालेय साहित्य मदत जमा करुन वाटप उपक्रम गेली २०वर्ष सूरू असल्याबद्दल आयटक घरकाम संघटना चे कौतुक केले. व पुढील काळात मदती साठी नक्कीच हातभार लावणार असे आश्वासन दिले. मा. विकास माळी , राजू देसले, महादेव खुडे यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करुन कार्यक्रमास सुरूवात केली.


आयटकचे राज्यसचिव कॉम्रेड राजू देसले यांनी आयटक कामगार संघटनेच्या माध्यमातून मदत केलेल्या विद्यार्थ्यांची धडपड बद्दल सांगताना, प्रयत्न केले तर आपले स्वप्न पूर्ण करणे नक्कीच शक्य असल्याने विद्यार्थ्यांनी न डगमगता परिस्थितीचा विचार न करता झेप घ्यावी, संघटना म्हणून आम्ही सोबत उभे आहोत असा विश्वास व्यक्त केला. समाजातील शिक्षणासाठी जाणीव असणाऱ्यांनी मदत करावी. ज्यानी मदत केली त्यांचे आभार मानले.


भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हाध्यक्ष कॉ. महादेव खुडे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी सदिच्छा दिल्या.  


सूत्रसंचालन प्राजक्ता कापडणे यांनी केले.घरकाम मोलकरीण संघटना नाशिक शहर कॉ. मीना आढाव, कैवल्य चंद्रात्रे, तल्हा शेख, पद्माकर इंगळे, प्रिया इंगळे उपस्थित होते. या वेळी घरकामगार मोलकरीण संघटना सल्लागार पद्माकर इंगळे यांची कन्या प्रिया इंगळे वैद्यकीय डॉ. झाल्याबद्दल. मा. विकास माळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आभार भीमा पाटील यांनी मानले. यावेळी ५५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...