अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा वर्षपूर्तीनिमित्त नाशिक शिवसेनेतर्फे भव्य आरतीचे आयोजन
![]() |
शिवसेनेच्या बैठकीत कार्यक्रमाबाबत पदाधिकाऱ्यांना माहिती देताना शिवसेना उपनेते विजय करंजकर |
नाशिक: अयोध्या येथील रामलल्ला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वर्षपूर्तीनिमित्त नाशिक शिवसेनेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ५.३० वाजता रामकुंड, नाशिक येथे प्रभू श्रीरामाची आरती आणि गंगा-गोदावरीची महाआरती होणार आहे.
नाशिक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना उपनेते विजय करंजकर यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रामभक्त आणि शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, शिवसेना पक्षाच्या वतीने २३ ते २७ जानेवारी दरम्यान 'भगवा पंधरवडा'चे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरवड्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती (२३ जानेवारी) आणि धर्मवीर आनंद दिघे यांची जयंती (२७ जानेवारी) साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप आणि महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे, महानगर प्रमुख प्रविण तिदमे यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.