लाखोंच्या स्वागत कमानीच्या चोरीचा प्रयत्न हाणून पडला
शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांची सतर्कता; लेखानगर येथे घटना
नाशिक: जुने सिडकोतील लेखानगर येथे नाशिक महापालिकेच्या स्वागत कमानीचे अवजड लोखंडी सांगाडे चोरून नेण्याचा प्रयत्न शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे यांच्या सतर्कतेमुळे हाणून पडला. या घटनेमुळे लाखोंच्या महापालिकेच्या मालमत्तेची चोरी रोखण्यात यश आले आहे.
जुने सिडको येथील प्रवेशद्वारावर स्वागत कमान आणि दिशादर्शक फलक उभारण्यासाठी नाशिक महापालिकेने ८० लाख रुपयांची तरतूद केली होती. यासाठी कमानीचे अवजड लोखंडी सांगाडे लेखानगर येथे आणून ठेवण्यात आले होते. परंतु, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून हे काम प्रलंबित राहिले, आणि सांगाडे तिथेच पडून होते. शुक्रवारी संध्याकाळी काही अज्ञात व्यक्तींनी गॅस कटरच्या सहाय्याने या लोखंडी कमानीचे तुकडे कापून आयशर कंपनीच्या ट्रक क्रमांक MH-46-F-5126 मधून साहित्य चोरून नेण्याचा प्रयत्न केला.
शिवसेना महानगरप्रमुख प्रविण (बंटी) तिदमे हे त्या परिसरातून जात असताना या प्रकाराची त्यांना माहिती मिळाली. त्यांनी तातडीने या प्रकाराचा विरोध केला व चोरट्यांची व्हिडीओ शूटिंग केली. त्यांच्या कडव्या विरोधामुळे चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढी मोठी मालमत्ता चोरून नेण्याचा प्रयत्न सुरू असताना महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत का, असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
प्रविण (बंटी) तिदमे यांनी महापालिकेकडे याबाबत तक्रार करण्याची तयारी केली असून चोरट्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. नाशिक महापालिकेने या घटनेची दखल घेत तत्काळ चौकशी करावी आणि जबाबदारांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. महापालिकेच्या मालकीच्या लाखोंच्या मालमत्तेची सुरक्षा सुनिश्चित करणे ही प्रशासकीय जबाबदारी आहे.