Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शनिवार, ४ जानेवारी, २०२५

 बालशिक्षण मंदिर गोरेरामलेन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत दणदणीत विजय




नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित बालशिक्षण मंदिर गोरेरामलेन विद्यालयातील होतकरू विद्यार्थ्यांनी त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवला. युवा स्फूर्ती संघ बेझे यांच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल पाच पारितोषिके पटकावून शाळेचे नाव राज्यभर गाजवले.


स्पर्धेत इयत्ता सातवीची विद्यार्थिनी इच्छा चव्हाण हिने आपल्या प्रभावी वक्तृत्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेत सुवर्णपदक आणि सात हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले. तर इयत्ता पाचवीचा स्वरूप बळावकर याने रजतपदकासह पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. कनिष्ठ गटातील या यशाने शाळेच्या वक्तृत्व परंपरेला उजाळा मिळाला आहे.


इयत्ता सातवीची ईश्वरी भालेकर हिने कांस्यपदक आणि तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले. तिच्याच वर्गातील समीक्षा वराडेने उत्तेजनार्थ बक्षिसासह एक हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले, तर इयत्ता सहावीचा सहास खैरनार याला विशेष पारितोषिक म्हणून पाचशे रुपये रोख बक्षीस मिळाले. सर्व विजेत्यांना प्रतिष्ठेच्या ट्रॉफी आणि प्रशस्तिपत्रांनीही गौरवण्यात आले.


"आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ अभ्यासातील प्राविण्य पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्य असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यादृष्टीने शाळा सातत्याने प्रयत्नशील असते," असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री. के.के. तांदळे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संपूर्ण शालेय परिवार आनंदित असून, येत्या काळात अशीच कामगिरी करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.


बालशिक्षण मंदिर गोरेरामलेन विद्यालयाने गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून, या यशाने शाळेची शैक्षणिक व सहशालेय क्षेत्रातील वाटचाल अधिक बळकट झाली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतील हे यश इतर विद्यार्थांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

 स्काऊट गाईड विषय भविष्याच्या दृष्टीने गरजेचा – कविता वाघ 

नाशिक:- आनंद मेळावा कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय स्काऊट गाईड नाशिक जिल्हा संघटक कविता वाघ 


नाशिक: मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय, गोरेराम लेन येथे दिनांक ४ जानेवारी २०२५ रोजी स्काऊट गाईड अंतर्गत ‘आनंद मेळावा - खरी कमाई’ उपक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्काऊट चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन.  

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय स्काऊट गाईड जिल्हा संघटक कविता वाघ होत्या. आपल्या भाषणात त्यांनी स्काऊट गाईड शिक्षणाचे महत्त्व विशद करताना सांगितले, "विद्यार्थ्यांना स्वावलंबन, नेतृत्वगुण, आणि शिस्त यासारख्या जीवनोपयोगी कौशल्यांचा पाया स्काऊट गाईडमुळे मिळतो. आजच्या युगात हे शिक्षण विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयुक्त ठरत आहे."  

कार्यक्रमाची सुरुवात लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले होते. उपक्रमात सुमारे ४०-४५ स्टॉल्स उभारण्यात आले. पाणीपुरी, पावभाजी, गुलाबजाम, आणि इतर स्वादिष्ट पदार्थ हे आकर्षण ठरले. स्टॉल्सच्या सजावटीत विद्यार्थ्यांनी आपले सर्जनशील कौशल्य दाखवले.  

विद्यार्थ्यांनी या उपक्रमाद्वारे 'कमवा-शिका' हा मंत्र आत्मसात केला. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. वाय. बी. गायधनी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले, "हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायाची तत्त्वे आणि आत्मविश्वास निर्माण करतो. विद्यार्थ्यांचा सहभाग कौतुकास्पद आहे."  

कविता वाघ यांनी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडच्या माध्यमातून मिळणाऱ्या शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध आणि जबाबदारीपूर्ण जीवनासाठी स्काऊट गाईडचा सक्रिय उपयोग करण्याचे आवाहन केले.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. एम. एस. पिंगळे यांनी केले, तर प्रास्ताविक जनता विद्यालय गोरेराम लेनच्या मुख्याध्यापिका श्रीम. वाय. बी. गायधनी यांनी केले. आभारप्रदर्शन श्रीम. के. एम. घुमरे यांनी व्यक्त केले.  

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवसाय व कौशल्य शिक्षणाचा अनुभव मिळाला. स्काऊट गाईडमधील प्रशिक्षण त्यांना भावी आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.  

याप्रसंगी जनता विद्यालय गोरेराम लेन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम‌ वाय.बी.गायधनी , बाल शिक्षण मंदिर गोरेराम लेन शाळेचे मुख्याध्यापक श्री.के.के.तांदळे , भारतीय स्काऊट गाईड नाशिक जिल्हा संघटक कविता वाघ, जनता विद्यालय व बाल शिक्षण मंदिर शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष व सदस्य , सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थीवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बुधवार, २५ डिसेंबर, २०२४

 किशोर येवले यांनी पिंच्याक सिल्याट स्पर्धेत रौप्य पदक जिंकून रचला नवा इतिहास



अबू धाबी, 22 डिसेंबर 2024:
अबू धाबी, दुबई येथे 18 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या 20 व्या जागतिक पिंच्याक सिल्याट स्पर्धेत महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट असोसिएशनचे महासचिव आणि इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष मा. श्री. किशोर येवले यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदक जिंकून देशासाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत 44 देशांतील 120 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. किशोर येवले यांच्या यशामुळे पिंच्याक सिल्याट खेळात नवा आदर्श प्रस्थापित झाला असून, त्यांनी युवा खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या यशाबद्दल नाशिक पिंच्याक सिल्याट असोसिएशनचे सचिव नागेश बनसोडे यांनी समस्त नाशिककरांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले.

पिंच्याक सिल्याट हा इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकार असून, टॅंडींग (फाईट), तुंगल (सिंगल काता), रेगु (ग्रुप काता), गांडा (डेमी फाईट), आणि सोलो (इव्हेंट) अशा पाच प्रकारांत तो खेळला जातो. 1 सप्टेंबर 2020 रोजी भारतीय क्रीडा मंत्रालयाने या खेळाचा समावेश 5% राखीव नोकरभरतीमध्ये केला आहे.

या खेळाला "युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकार," "भारतीय विश्वविद्यालय संघ," आणि "अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण मंडळ" यांसारख्या संस्थांची मान्यता असून, तो एशियन गेम्स, युथ गेम्स, आणि एशियन बीच गेम्स यांसारख्या प्रमुख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अधिकृतपणे खेळला जातो.

गोव्यात 14 मे 2023 रोजी झालेल्या 37 व्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने पिंच्याक सिल्याट खेळाचा समावेश केला होता. महाराष्ट्र संघाने मागील 11 वर्षांपासून या खेळात आपले वर्चस्व कायम राखले आहे.


बुधवार, ११ डिसेंबर, २०२४

मोक्षदा एकादशी विशेष : 

रंगे विठूचा सोहळा 

 स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे 

प्रातिनिधिक चित्र 



 पंढरपूरातला विठ्ठल मायबाप सावळा , 

गळ्यात त्याच्या तुळशीच्या माळा, 

कसं सांगू रे मी तूला 

रंगे विठूचा सोहळा....


भरते विठ्ठल नामाची शाळा, 

जीव आहे त्यात माझा सगळा, 

मला छंद तुझा रे लागला, 

रंगे विठूचा सोहळा... 


भक्तांच्या हातात टाळ तर गळ्यात माळा, 

देव तू आमचा विठू सावळा, 

प्रसिद्ध देव तू माझ्या दडलेला, 

रंगे विठूचा सोहळा...

मंगळवार, १० डिसेंबर, २०२४

 जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह नाशिकतर्फे "विद्यार्थी करीअर समाधान" उपक्रमाचा शुभारंभ




नाशिक :- शहरातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्यासह इतर विद्यार्थ्यांसाठीसुद्धा जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त उपक्रम घेऊन येत आहे. मोफत विद्यार्थी करीअर समाधान - २४x४८ मार्गदर्शन सेवा या नावाने सुरू होणाऱ्या या उपक्रमाचा शुभारंभ १ जानेवारी २०२५ रोजी पासून होणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअर संदर्भातील अडचणी सोडवून योग्य दिशा दाखवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 


सदरील उपक्रम हा ऑनलाइन पद्धतीने अर्थात व्हाट्सअप आणि ईमेल द्वारे कार्यरत असणार आहे. ह्या उपक्रमासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसून सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम खुला असून इयत्ता , वर्ग , वयोगट इ. कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही. 


विद्यार्थ्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या टप्प्यावर योग्य निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. परंतु अनेकदा त्यांच्याकडे योग्य मार्गदर्शन उपलब्ध नसते किंवा उपलब्ध मार्गदर्शन अनेकदा सरधोपट असते. त्यामुळे "विद्यार्थी करीअर समाधान" हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्यावर सखोल आणि वैयक्तिक मार्गदर्शन प्रदान करेल.  




या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी त्यांचे करिअरशी संबंधित प्रश्न व्हाट्सअप क्रमांक 9529195688 किंवा ईमेल आयडी jivankeshrimarathi@gmail.com वर पाठवू शकतात. ही सेवा दररोज दुपारी २ ते सायंकाळी ९ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. विद्यार्थ्यांनी पाठवलेले प्रश्न अभ्यासून त्यांचे समाधान २४ ते ४८ तासांच्याआत व्हाट्सअप किंवा ईमेलद्वारे करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर उत्तर शोधताना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर केला जाईल, तसेच संबंधित विषयातील तज्ज्ञांशी चर्चा करून अचूक मार्गदर्शन दिले जाईल.  


विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींसाठी या सेवेचा उपयोग होईल, जसे की:  

- शाखा निवड (सायन्स, आर्ट्स, कॉमर्स): कोणती शाखा भविष्यातील करिअरसाठी योग्य आहे?  

- व्यावसायिक अभ्यासक्रम: इंजिनिअरिंग, मेडिकल, चार्टर्ड अकाउंटंट (CA), लॉ अशा क्षेत्रांमध्ये जाण्यासाठी काय तयारी करावी?  

- तंत्रज्ञान क्षेत्र: आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये करिअरची संधी.  

- स्पर्धा परीक्षा:UPSC, MPSC, बँकिंग, पोलीस भरती अशा परीक्षांची तयारी कशी करावी?  

- इतर संधी: क्रीडा, कला, संगीत, नाट्य, पत्रकारिता यांसारख्या क्षेत्रांमध्ये करिअरची दिशा.  


उपक्रमाच्या शुभारंभाबद्दल विद्यार्थी प्रतिनिधींनी आपले विचार व्यक्त केले आहेत.  

कु. प्रसाद भालेकर, विद्यार्थी प्रतिनिधी यांची प्रतिक्रिया , “विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात, पण ते विचारायची योग्य जागा आणि योग्य व्यक्ती सापडत नाही. हा उपक्रम विद्यार्थ्यांना आपल्या करिअरसाठी योग्य निर्णय घेण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल.”  

कु. आदित्य रिकामे, विद्यार्थी प्रतिनिधी यांची प्रतिक्रिया, “विद्यार्थ्यांना वाटणारा संभ्रम कमी होण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे. AI तंत्रज्ञानाचा उपयोग करून अचूक आणि तत्काळ मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज आहे.”  


शहरातील विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, "करिअर निवडण्यासाठी अनेक पर्याय असल्यामुळे संभ्रम होतो. पण या उपक्रमामुळे योग्य दिशा मिळण्याची खात्री वाटते."  


जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहाचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणतात, "विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशेने मार्गदर्शन करणे हेच आमचे ध्येय आहे."  


१ जानेवारी २०२५ पासून सुरू होणाऱ्या या उपक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांनी अवश्य घ्यावा!


संपर्क:

व्हाट्सअप क्रमांक : 9529195688  

Email: jivankeshrimarathi@gmail.com  

सेवा वेळ: दुपारी २ ते सायं. ९

कालावधी:- १ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी २०२५ अशी असणार आहे. 


नाशिक शहरातील विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील व राज्यातील विद्यार्थ्यांसाठीही ह्या उपक्रमाचे द्वार खुले असून आम्ही विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी तत्पर आहोत व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यार्थी प्रतिनिधींनी केले आहे.


सदरील उपक्रम इयत्ता दहावी तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून त्यांनी आवर्जून ह्यात सहभागी व्हावे असेही उपक्रमाच्या आयोजकांनी केले आहे.




शूरवीर मराठा ( स्वरचित कविता )

 शूरवीर मराठा ( स्वरचित कविता )

- कवयित्री :- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे, विद्यार्थिनी - मविप्र संचलित, जनता विद्यालय, पवननगर, नाशिक

( प्रातिनिधिक चित्र ) 

 


ते मराठ्यांसाठी लढले 

ते स्वराज्याचा नवा दिवाचं ठरले 

चुडीली संपूर्ण दरबार 

नाही केला स्वतःचा कधी विचार 

उज्वल जीवन ते जगले 

ते मराठ्यांसाठी लढले 


तो संसार , तो श्वास 

सोसला किती तास 

कुणी रक्ताशी खेळले

ते मराठ्यांसाठी लढले 


लढली - झगडली जनता 

मग स्वातंत्र्याचा हिंदू शब्द आता 

किल्ल्यांवरती भगवी फडफडले 

ते मराठ्यांसाठी लढले 


हा मराठा शब्द साक्षीला 

करा मुजरा पण त्याला 

पोवाडे गाऊया आपले 

ते मराठ्यांसाठी लढले 


राजमुद्रेच्या या शब्दांवर 

लोकांच्या या मनावर 

भव्य रक्त ते कोसळले 

ते मराठ्यांसाठी लढले 


ते मराठ्यांसाठी लढले 

 ते मराठ्यांसाठी लढले....! 

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४

 नाशिक महानगरपालिकेच्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे मानधन रखडले ; शहरव्यापी आंदोलन 


नाशिक, दि. ६ डिसेंबर (विशेष वार्ता):

नाशिक महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या ६०० ते ७००  अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे दोन महिन्यांपासूनचे मानधन अद्याप थकीत असून, या महिलांच्या जीवनावर गंभीर आर्थिक संकट कोसळले आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये विधवा, परित्यक्ता आणि एकाकी महिलांचा मोठ्या संख्येने समावेश असून, त्यांची परिस्थिती अतिशय हालाखीची बनली आहे.


महिलांचे बहुमोल योगदान:

स्थानिक प्रशासनाने विविध महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये या महिलांचा सक्रिय सहभाग घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरणे, विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेत सहभाग आणि समाजकल्याणाच्या विविध उपक्रमांमध्ये या महिलांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. परंतु या सर्व कार्यांनंतरही त्यांचे मानधन अदा करण्यात आलेले नाही.


आर्थिक चणचण:

प्रत्येक अंगणवाडी सेविकेचे मानधन सुमारे ५,००० रुपये असून, ऑक्टोबर महिन्याचे मानधन रखडले आहे त्याचप्रमाणे नोव्हेंबर महिन्याचे मानधन देण्याची वेळ झाली आहे . अनेक कुटुंबांवर उपजीविकेचे गंभीर संकट कोसळले असून, या महिलांना दैनंदिन खर्चासाठी संघर्ष करावा लागत आहे.


विषमतेचा मुद्दा:

महानगरपालिकेत दुप्पट ते तिप्पट मानधन असणाऱ्या अधिकाऱ्यांना वेळेवर मानधन अदा केले जात असतानाच, या महिला कर्मचाऱ्यांचे मानधन रखडले आहे. ही स्पष्ट आर्थिक विषमता समोर येत आहे.


आंदोलनाचा इशारा:

अंगणवाडी सेविकांनी महानगरपालिकेच्या मुख्यालयावर जाऊन आपल्या मानधनाची मागणी करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील काही दिवसांत व्यापक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या महिलांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून, त्यांची धैर्याची कमान धोक्यात येत आहे.


महिला सशक्तीकरणाच्या चर्चेत:

या प्रकरणामुळे महिला सबलीकरणाबाबतचे दावे केवळ सैद्धांतिक पातळीवरच राहात असल्याचे स्पष्ट होत आहे. प्रत्यक्ष कृतीत मात्र महिलांचे शोषण सुरूच असल्याचे चित्र समोर येत आहे.


निष्कर्ष आणि आवाहन:

महानगरपालिका प्रशासनाने या प्रकरणाकडे तत्काळ लक्ष देऊन संबंधित महिला कर्मचाऱ्यांचे मानधन अदा करावे. अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांमार्फत पुढील कायदेशीर पावले उचलण्याचा इशारा देण्यात येत आहे.


या प्रकरणाने नाशिक महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, महिलांच्या हक्कांबाबत संवेदनशीलतेचा अभाव स्पष्टपणे समोर आला आहे.


नाशिक महानगरपालिकेतील मानधनावरील कार्यरत कर्मचारी व कंत्राटी कामगार आदी. यांना ५ तारखेच्या आत मानधन मिळायला हवे. यांच्या मानधनाची रक्कम ही तुटपुंज्या स्वरूपाची आहे. तरीही प्रदीर्घ काळ लावणे आणि लज्जास्पद बाब आहे. अनेक महिलांवर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. याची नाशिक महानगरपालिकेने नोंद घेणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजनेचे काम असो किंवा मतदार यादी पोहचवणे इ. सर्व सर्वेक्षण कामांसाठी सर्वप्रथम अंगणवाडी सेविका व मदतनीस आठवतात आणि नंतर गरज सरो वैद्य मरो हीच परिस्थिती निर्माण होते. 
लवकरात लवकर मानधन न दिल्यास आणि समस्यांचे निराकरण न झाल्यास संपूर्ण नाशिक शहरात भव्य शहरव्यापी आंदोलन करून नाशिक महानगरपालिका प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवण्याचा तीव्र इशारा अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी दिला 


विकसित महाराष्ट्राला शिक्षणाची कमी विकसित महाराष्ट्राला शिक्षणाची कमी ...