Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, १२ जून, २०२२

PRASAD BHALEKAR


PRASAD BHALEKAR , NASHIK EDITING 👍👍👍

माझी शाळा

*माझी शाळा*

आयते शर्ट 

ते बी ढगळ,

चड्डीला आमच्या

मागून ठिगळ!!


                     त्यावर करतो

                     तांब्यानी प्रेस,

                     तयार आमचा

                     शाळेचा ड्रेस!!

                                 

खताची पिशवी

स्कूल बॅग,

ओढ्याचं पाणी

वाॅटर बॅग!!

       

                  धोतराचं फडकं

                  आमचं टिफीन,

                  खिशात ठेवुन

                  करतो इन!!


करदोडा आमचा

असे बेल्ट,

लाकडाची चावी

होईल का फेल ?


                 मिरचीचा ठेचा

                 लोणच्याचा खार,

                 हाच आमचा

                 पोषण आहार!!

              

रानातला रानमेवा

भारी मौज,

अनवाणी पाय

आमचे शुज!!


                 काट्यांच रूतणं

                 दगडांची ठेच,

                 कसा सोडवायचा

                 हा सारा पेच!!


मुसळधार पाऊस

पाण्याचा कडेलोट,

पोत्याचा घोंगटा

आमचा रेनकोट!!


               जुन्या पुस्तकांची

               अर्धी किंमत,

               शिवलेल्या वह्यांची

               वेगळीच गंमत!!


पेन मागता

कांडी मिळायची,

गाईड मागण्याची

भिती वाटायची!!


                केस कापण्याची

                एकच शक्कल, 

                गप्प बसायचे    

                होईपर्यंत टक्कल!!               


📖📚📖📚📖📚📖📚

ज्यानी अशी शाळा शिकली,त्या सर्वाना समर्पीत🙏


*🌸🌹शाळा एक आठवण🌹🌸*

*शिवचरित्रमाला भाग - ८५

 🚩 *शिवचरित्रमाला भाग ८५*🚩


*माघ वद्य नवमीची रात्र....!*



यावेळी प्रतापगडच्या मावळतीला असलेल्य डोंगर-वेढ्यातील ‘ उमरठ ‘ या गावात लग्नाचा मांडव पडला होता म्हणे! हे लग्न प्रत्यक्ष उमरठकर सुभेदार तानाजीराव मालुसरे यांच्या मुलाचं होतं म्हणे. रायबा हा त्यांचा लहानसा मुलगा.

या सगळ्या कथा मराठी प्रत्येक कानामनाला गेली 3 ०० वर्ष ठाऊक आहेत. त्यावर तुळशीदार शाहीर या नावाच्या शाहिराने चौकबंद मोठा पोवाडाही रचलेला सापडला आहे. बखरीतून थोडीफार माहिती लिहिलेली आहे. पण यात अभ्यासकांच्या मते मतभेदाचे मुद्देही अनेक आहेत. एवढे निश्चित की , सिंहगड काबीज करण्याची कामगिरी महाराजांनी तानाजी मालुसरे या जबऱ्या मर्दावर सोपविली. तानाजी हा स्वराज्याच्या लष्करात एक हजार पाइकांचा सुभेदार आहे. त्याला एक सख्खा भाऊ आहे. त्याचे नाव सूर्याजी.

मोंगलांच्या विरूद्ध तडजोडीनंतर आपले किल्ले परत होण्यासाठी महाराजांनी जी मोहीम उघडली. त्या मोहिमेचा पहिला नारळ तानाजीच्याच हातात त्यांनी दिला या विषयी मतभेद नाही. मुहूर्त होता माघ वद्य नवमी , शुक्रवार दि. चार फेब्रुवारी १६७० मध्यरात्रीचा.

ही मोहीम करण्यासाठी तानाजी सुमारे ५०० मावळे घेऊन राजगडावरुन निघाला , हे ही पूर्ण सत्य. आता थोडा अभ्यास करू या. मोहीम प्रत्यक्ष हाती घेण्यापूवीर् गडाची अवघड सवघड बाजू तानाजीने लक्षात घेतली असले की नाही ? गुप्त हेरगिरीने गडाच्या घेऱ्यात आपल्याला गुपचूप पोहोचता येईल , बोभाटा होणार नाही यासाठी त्याने काही प्रयत्न केले असतील का ? प्रत्यक्ष अस्सल समकालीन कागदपत्रात हे काहीच सापडत नाही. कागदच नाहीत. पण तुळशीदार शाहिराच्या पोवाड्यातील ऐन मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवले , तरी गडाच्या भोवती असलेल्या उतरणीवरील जंगलातील मेटकऱ्यांशी तानाजीने संधान बांधले व घेरे सरनाईकाला त्याने आपलेसे केले , हे पूर्ण संभाव्य वाटते. गडावर एकूण मोगली सैन्य दीड हजार असून तटावर ठिकठिकाणी जबर तोफा खड्या आहेत अन् गडाच्या विशेषत: पश्चिमेच्या कड्यावर उत्तरार्धात तटबंदी बांधीव नाही , अन् त्या बाजूस पहारेही जरा कमी आहेत. असे तानाजीच्या लक्षात आहे. व त्या दृष्टीनेच तो या कड्याखाली नेमका आला. नाहीतर तो तसा आला नसता. ही सर्व माहिती घेरेसरनाईक मेटकऱ्याकडून तानाजीला मिळाली हा जो पोवाड्यात व उत्तरकालीन आख्यायिकांत सूर दिसतो तो सत्य असण्याची शक्यता आहे.

एक तर तानाजीचे (म्हणजे महाराजांचेही पण) निश्चित ठरलेले दिसते की , नेहमीच्या ढोबळपद्धतीने गडावर चाल करावयाची नाही. गडाला वेढा घालून माहिनोन् महिने झुंजत बसावयाचे नाही. तर अचानक झडप घालून (सरप्राइज अॅटॅक) गड कब्जात घ्यावयाचा. गडावर अशी झडप घातली व प्रवेश मिळविला तर त्यांच्या तोफखान्याचा काहीही उपयोग त्यांना होणार नाही. त्या निरूपयोगी ठरतील. जी काही झंुज द्यावी लागेल ती समोरासमोर द्यायची. त्यात अवघड भाग फारफार मोठा होता. एकतर गडात प्रवेश मिळवणे अत्यंत अवघड अन् मिळाला तर गडावरचे सैन्य आपल्या तिप्पट आहे याची जाणीव मराठ्यांना निश्चित आहे.

म्हणूनच तानाजीने मेटावरच्या कोळी मेटकऱ्यांशी आधीपासून संधान बांधून अचानक छाप्याची तयारी चोख केलेली होती , असे दिसते.

तानाजी चार फेब्रुवारी १६७० च्या मध्यरात्री म्हणजे बहुदा दोन अडीच वाजता निबिड अरण्यात अन् गडाच्या उतरणीवर आपल्या लोकांनिशी येऊन पोहोचला.

गडवरचं वातावरण शांत सुन्न होतं. गस्तीची पाळी असलेले मोंगल सैनिक आपापल्या जागी गस्त घालीत होते. किल्याची दोन प्रवेशदारे पुण्याच्या दिशेला म्हणजे उत्तरेला एका पाठोपाठ एक असे तीन मोठे दरवाजे आणि दक्षिणेच्या बाजुल असे दोन दरवाजे. या बाजूने किल्याच्या खाली कल्याण नावाचे खेडेगाव आहे. म्हणून या दरवाज्यास कल्याण दरवाजा हे नाव होते. आणि उत्तरेच्या बाजूच्या दरवाजांना पुणे दरवाजा असे नाव होते. वास्तविक उदयभान राठोड हा मोंगली किल्लेदार अतिशय निष्ठावंत आणि दक्ष होता. त्याचं काम किल्लेदार या नात्यानं तो ठीक करीत होता. पण तानाजीने किल्ल्याच्या आणि किल्लेदाराच्या दुबळ्या दुव्यांचा अचूक शोध आणि वेध आधीच गुप्त रितीने किल्याच्या सरघेरेनाईकांकडून मिळविला होता. खरं म्हणजे स्वराज्य आणि मोंगलाई यातील तह उघडउघड मोडल्यानंतरचे हे दिवस आहेत. उदयभानने अधिक जागरुक दक्षता घ्यायला हवी होती. पण एकूण किल्याच्या अवघड खांदाबांधा , आपली गडावरील माणसेही उत्तम , तोफा आणि बारूदगोळा अगदी सुसज्ज , दरवाजे अगदी भक्कम अशा या जमेच्या भांडवलवर उदयभान निचिंत होता. नेमका अशाच माघ वद्य नवमीच्या मध्यरात्रीच्या काळोखातला मुहूर्त तानाजीने पकडला आणि चित्यांच्या चोरपावलांनी पाचशे मावळ्यांनिशी तो गडाच्या पश्चिमांगास भिंतीसारख्या ताठ उभ्या असलेल्या कड्याच्या कपारीशी येऊन पोहोचला ही नेमकी जागा गडाच्या माथ्यावर दुबळी होती. पहारे नसावेतच किंवा अगदी विरळ होते. या बाजूला तटबंदीही अगदी अपुरी आहे. या जागेचं नाव किंवा या कड्याचं नाव डोणगिरीची कडा.

स्वत: तानाजी आणि असेच आणखी तीन-चार गडी कड्याशी आले. प्रत्येकाच्या खांद्याला एकेक लोखंडी मेख आणि वाखाची बळकट दोरखंडाची वेटोळी होती. तानाजीसह हे दोरखंडवाले मावळे कडा चढू लागले. हे काम फार फार अवघड आणि धोक्याचंही असतं कड्याला खडकांत असलेल्या खाचीकपारीत पावलं आणि हाताची बोटं घालून चाचपत चाचपत वर चढायचं. त्यात अंधार दाट. कुठे कपारीत जर सापानागीणीनं वेटोळं घातलेलं असलं अन् त्याला धक्का लागला तर ? तर मृत्यूच. कुठे मधमाश्यांचं किंवा गांधील माश्यांयं पोळं लागलेलं असलं तरीही संकटच. कुठं गिधाडांनी कपारीत अंडी घालून त्यावर उबविण्यासाठी पंखांचा गराडा टाकून बैठक मांडली असली तरी कठीणंच. आजच्या काळात कडे चढणाऱ्या गिर्यारोहकांस याची अचूक कल्पना येऊ शकेल. अशा अवघड धोक्यांना सामोरे जात जात एक भीती मावळ्यांच्या मनगटात आणि पावलीत सतत जागी होतीच , की एखाद्या कपारीतून आपला हात किंवा पाऊल सट्कन निसटलं , तर भयाण मृत्युशिवाय दुसरं कोणं आपल्याला झेलील ? अशा या डोणागिरी कड्याची उंची किती होती ? होती आणि आजही आहे सुमारे बावीस , चोवीस पुरूष ?

अशा या कड्याच्या माथ्यावर पक्या तटबंजीचीही जरूर नाही अन् या बाजूने कोणताही शत्रू कधीच येणं शक्य नाही अशा पूर्ण विश्वासानं किल्लेदारानं येथील बंदोबस्त अगदी ठिसूळ ठेवलेाल असावा.

नेमकी हीच जागा वानरांसारखी चढून जाण्याकरीता तानाजीनं ठरविली होती. तो चढत होता. आणखी एक गोष्ट लक्षात येेते की , सिंहगड यापूवीर् मराठी स्वराज्यातच होता. तानाजी सुर्याजी आणि असंख्य मावळ्यांनी सिंहगडावर राहून , हिंडून अन् फिरून गडाची माहिती प्रत्यक्ष अनुभविली होती.


मावळे अन् तानाजी वर पोहोचले. त्यांनी खांद्यावर अडकविलेले दोरखंड वर मेखा अडकवून कड्याखाली सोडले. अन् मग भराभरा सर्वच मावळे वर आले. मोठ्या प्रमाणात वस्ती गस्ती आणि राबता गडाच्या दक्षिण पूर्व व उत्तर बाजूला होता. तानाजी हत्यारे सरसावून त्या दिशेला पुढे सरकू लागला. मावळेही. अन् एका क्षणी मोंगली सैनिकांचा आणि शांततेचा एकदमच भडका उडाला. युध्द पेटले.


– बाबासाहेब पुरं


दरे


🚩 *क्रमशः*🚩

सेवा - निवृत्ती हा शाप की वरदान ?

 सेवा-निवृत्ती शाप की वरदान!* 

    

प्रत्येकाने वाचावी: ह्रदय पिळवटून टाकणारी कथा .. रिटायर्ड माणूस


*जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस!*


  ठरल्याप्रमाणे, म्हणजे अगदी सटवाईनं लिहून ठेवल्याप्रमाणे ५८/६० व्या वर्षी तो रिटायर्ड झाला आणि त्याचं जगच बदललं.


        नोकरीत असतांना त्याची एक ठराविक दिनचर्या होती. 


सकाळी साडे नऊला तो घराबाहेर पडायचा. 


अत्यंत प्रामाणिकपणे ऑफिसच्या वेळांत नेमून दिलेलं काम आटपायचा.


 भाजी, किराणा सामान घेत, भेटलेल्या कुणाशी चर्चा करून रमत गमत घरी परतायला त्याला संध्याकाळचे सात वाजत आल्यावर जेवण, शतपावली वगैरे झालं की पलंगावर पडल्या बरोबर त्याचे डोळे मिटायला लागत. 


*ऑफिसात सगळा स्टाफ त्याच्या वर खुश असायचा. त्याचा हसरा चेहरा बघायची संवय झालेले त्याचे सहकारी त्याच्या रिटायर्डमेंटच्या सभारंभाला खूप हळहळले, पण सरकारी नियमांपुढे सर्वांचाच नाईलाज होता.*


एरवी त्याचे दिवसभराचे कार्यक्रम इतके साचेबध्द होते की ,सुटीच्या दिवशी घरांत त्याचा जीव घाबरायला लागायचा. 


दुपार खायला उठायची 

आणि 

करायला काहीच नाही म्हटल्यावर त्याचे पाय बायकोच्या हक्काच्या स्वैंपाकघराकडे वळायचे. 


मग ही बरणी उघड, तो डबा उचक, असे त्याचे उद्योग दुपारभर चालायचे. वामकुक्षी आटोपून बायको उठली की तिला विस्कटलेलं स्वैंपाकघर दिसे

आणि 

तिचा संताप होई. 


सुटीचा एक दिवसही हा माणूस घरांत नको, असं तिला वाटायला लागे. 


त्यालाही अपराध्यासारखं होत असे, जितके व्यवस्थित आपण ऑफिसात असतो.


 तेवढं घरी रहाणं जमत नाही ,ही खंत त्याला पुढील आठवडाभर त्रास देई.


रिटायर्ड झाल्यापासून तो कायम घरांतच असायचा.


 तिला मात्र याचा त्रास व्हायचा. तिच्या हौशीचे दिवस कधीच सारून गेले होते 


आणि 


जेंव्हा हौस करायची वेळ होती ,तेंव्हा हा सतत ऑफिसचं तुणतुणं वाजवायचा, हे ती विसरली नव्हती, किंबहुना तिच्या मनांत याचा सुप्तसा रागही असावा.


*गरजेपुरता पैसा घरांत येत असला की माणसांचं ओझं व्हायला लागतं.*


 वर्षानुवर्षाच्या त्याच्या संवयी तिला आता त्रासदायक होऊ लागल्या, त्याच्याबद्दलच्या तिच्या तक्रारी वाढू लागल्या.


 त्याने स्नान केल्यावर ओला टॉवेल पलंगावर फेकायची त्याला संवय होती, तो ऑफिसात जायचा तेंव्हा ती कर्तव्य म्हणून तो ओला टॉवेल उचलून धुवायला घेत असे ,पण आता त्याला ‘भरपूर वेळ असल्यानं असली कामं त्यानेच आपणहून करायला हवीत’ असा तिचा आग्रह होता.


*हा आग्रह त्याला मान्यही होता, मात्र तिने सूचना चांगल्या शब्दांत द्याव्या, असा त्याचा सूर होता. तिच्या स्वभावामुळे कदाचित, तिला त्याची ही गोड बोलण्याची अपेक्षा पूर्ण करणं जमत नव्हतं.*


तो रिटायर्ड होऊन आरामाचं आयुष्य जगतोय 

आणि 

आपल्याला मरेपर्यंत रिटायर्ड होता येणार नाही ,

ही जाणीव तिला बोचत असावी. 


खरं तर तिचंही वय उताराला लागलं होतं 

आणि 

व्याप वाढत असल्याने तिची आता दमछाक होऊ लागली होती. 


मुलांची लग्न, *सुनेशी जमवून घेतांना होत असलेली तारांबळ,* तो घरीच असल्याने त्याचेकडे येणारी माणसं, 


आणि


 हे कमी का काय म्हणून चोवीस तास समोर वावरत असलेला, 


पण घरकामाला काडीचा हातभार न लावणारा तीचा हा स्थितप्रज्ञ नवरा. 


तो समोर नसला की, त्याच्याबद्दलच्या असूयेनं आणि 

समोर असला की त्याचं तोंड बघूनच तिचं रक्त उसळायला लागायचं. 


तो पाणी प्यायला जरी स्वैंपाकघरात शिरला तरी ‘तू मुद्दाम माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करतोस’ म्हणत ती त्याला झिडकारायची. 


*हळूहळू तिला तो डोळ्यासमोरही नकोसा होऊ लागला.* 


आणि 

त्या दिवशी ती प्रचंड चिडली.


 कारण 


काय होतं कुणालाच कळलं नाही, तिलाही. 


पण इतक्या दिवसांचा मनांत साचलेल्या रागाचा स्फोट झाला 

आणि 

तिने त्याच्यावर खूप आरडा ओरडा केला.


 त्याला अद्वा तद्वा बोलली, थेट 

त्याच्या आई वडिलांचा, बहीण भावांचा उद्धार केला.


 तो हादरला, पण रिअॅक्ट करण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. 


तो तिला चिडायची कारणं विचारत राहिला. 

आणि 

ती प्रत्येक वेळी सांगत राहिली, *‘तू मला आता डोळ्यासमोर नकोस, बस्!*


त्याने ऐकलं 

आणि 

निराश होत विचारलं!


 *‘आयुष्याच्या या स्टेजवर आता मी कुठे जाऊ?’* तिला वाटलं हा चिडवतोय,


 ती मग आणखीनच चिडली.


 हातवारे करत किंचाळली! *‘कुठेही जा. मेलास तर फारच बरं होईल, माझी सुटका तरी होईल.’*


 हे ऐकून हा एकदमच शांत झाला.

 तश्याही परिस्थितीत म्हणाला, 

*‘ते माझ्या हातात नाही, पण तुझा शाप माझ्या आतपर्यंत पोहोचला. तू मात्र खूप जग, माझं उरलेलं आयुष्य तुला मिळू दे. शतायुषी हो!* 


हे असं वारंवार होऊ लागलं. अगदी चिमुटभर कारणा साठीही ती त्याला मरणाचा शाप द्यायची 

आणि 

मोबदल्यात 

तो तिला 

शतायुषी होण्याचा आशीर्वाद द्यायचा. 


तिच्या मनांत तसं काही नसायचं.


 त्याने खरंच त्यांच्या संसारातून, या जगातून कायमचं निघून जावं असं तिला वाटणं शक्यच नव्हतं.


 शेवटी 

तिनेही त्याचेबरोबर पस्तीस छत्तीस वर्ष संसार केला होता, त्याने बांधलेलं मंगळसूत्र तिने सन्मानाने मिरवलं होतं, वर्षानुवर्षे त्याचं आयुष्य वाढावं म्हणून वड पुजले होते, हरताळकेचे कडकडीत उपास घातले होते, त्याचा मृत्यू मागण्या इतकी ती खचितच दुष्ट नव्हती. 


पण

 तिच्यासमोरचा त्याचा सतत होणारा वावर जाणवला की

 तिची विचार शक्ती संपूर्णपणे नष्ट व्हायची, 

मेंदू अक्षरशः पेट घ्यायचा आणि 

तिच्या तोंडातून नको ते शब्द बाहेर पडायचे 

आणि 

एक दिवस अचानकच 

तो गेला.


 सकाळी उठून त्याने चहा घेतला, लांब फिरून आला आणि ‘थकवा वाटतोय’ म्हणत सोफ्यावर आडवा झाला तो उठलाच नाही.


घरांत धावपळ झाली, 

डॉक्टर आले,

 त्यांनी तपासलं 

आणि 

त्यांच्या प्रथेनुसार 

इंग्रजीत 

‘सॉरी, ही इज नो मोअर’ सांगितलं. 


एकच हलकल्लोळ झाला.


तो मात्र त्याच्या स्वभावा प्रमाणेच एकदम शांत पहुडला होता. 


प्रत्येकजण त्याच्या वेदनारहित मृत्यूचा हेवा करीत होते. 


‘Before Time असं मरण नको होतं ,असा प्रत्येकाचाच सूर होता.


तिच्यासाठी मात्र लोक खूपच हळहळले ‘आता कुठे सुखाचे दिवस आले होते, नवऱ्याचा पूर्णकाळ सहवास लाभला होता ,तर ही वेळ आली’ असे लोक म्हणत होते .


 आकाशाकडे बोट दाखवून, ‘त्याच्या इच्छेपुढे कुणाचं काय चालतयं का ? वगैरे बोलून तिचं औपचारिक सांत्वन करून लोक त्यांच्या निघून गेले. 


*आता ती एकटी राहिली. प्रेम, राग, विरोध, काळजी या मनातील भावना व्यक्त करायला हक्काचं कुणी उरलं नाही.


* तसं मुलं, सुना लक्ष द्यायचे तिच्याकडे, पण त्यांना त्यांचाही संसार होता.


तिनं देवळं धुंडाळली, मित्र मैत्रिणी झाले, *काही काळ माहेरच्यांचं कौतुक झालं, मग मात्र सारेच आपोआप दूर झाले.*


असेच दिवस जाऊ लागले, महिने गेले, वर्षे सरली. मुलांनी थाटात तिचा पंच्याहत्तरावा वाढदिवस साजरा केला. 


पण ‘सतत तुझंच कौतुक कसं करायचं ?’

 म्हणत मग त्यांनीही अंतर राखायला सुरुवात केली.


नातू, नात लहान होते तोवर तिचे होते, 

मोठे झाल्यावर त्यांचं जग विस्तारलं, 

आजीचा पदरही न सोडणारी बाळं तिनं चारदा आवाज दिल्यानंतर एकदाच ‘काय आहे आजी?

’ असं चिडक्या स्वरांत विचारू लागले. 


तिला हे त्रासदायक व्हायचं, नेमका तेंव्हाच, नवऱ्याशी केलेला व्यवहार आठवायचा, पण *‘काळाला मागे नेऊन चूक सुधारता येत नाही’* हे ठाऊक असल्याने, तिला नेमून दिलेल्या जागी पडलेला चेहरा घेऊन ती बसून रहायची. 


तिच्या वयाचा आकडा वरवर जात राहिला, कार्यक्षमता मात्र दर दिवसाला कमी होत गेली. 


आता मात्र ती प्रचंड थकली, हातपाय चालणं कठीण झालं, वेळ काढणं जड जाऊ लागलं. 


'तुझी उपयोगिता संपायला आलीय' याची जाणीव लोक आडून पाडून तीला करून देऊ लागले 


आणि

 *नकळत ती मरणाची वाट बघायला लागली.*


एव्हाना पन्नाशी ओलांडलेले मुलगा 

आणि

 सूनही 

थकायला लागले होते.


 त्यांनाही त्यांचे जावई सुना आल्या होत्या 

आणि 

नवी सून 

तिच्याच सासूचं काही करेना,

 तिच्याकडून

 आजेसासू साठी काही अपेक्षा करणं 

तर 

फारच कठीण होतं. 


ती रोज आतल्या आत रडायची.


 ‘देवा, उचल मला’ म्हणून प्रार्थना करायची. 


‘भोग भोगायला मला एकटीला अश्या परिस्थितीत सोडून 

तो सुखासुखी निघून गेला’

 म्हणत मनातल्या मनांत त्याला दुषणं देत पडून रहायची. 


फारसं आठवायचं नाही 

तिला काही 

आज काल. 


मात्र तिने दिलेले 

शाप 

आणि 

त्याने दिलेले आशीर्वाद,


 प्रयत्न करूनही तिच्या स्मृतीतून निघत नव्हते....!


‘मेलास तर फारच बरं होईल,


 माझी सुटका होईल.’

 हा

 तिनं त्याला दिलेला

 शाप होता 

की 

आशीर्वाद होता!


 ‘तू मात्र खूप जग, 

शतायुषी हो,’ 

हा त्याने तिला दिलेला आशीर्वाद होता

 का 

शाप होता

 की आशीर्वाद ?

 हे मात्र 

तिला तिचंच कळत नव्हतं....


*मित्रांनो!*


आपलेही 

बरेच मित्र सेवेतून निवृत्त झाले आहेत 

व 

काही निवृत्ती'च्या उबंरठ्यावर आहेत. 


एकमेकांना खूप जीव लावा आणि उर्वरित आयुष्य सुखाने जगा.


*सदरचा लेख कुणी लिहिला ,* *माहित नाही.*  


मात्र लेखकाने लिहीलेले प्रसंग कुणाच्या तरी आयुष्यात घडून गेलेले असावेत, 

असे जरी ग्रहित धरले तरी देखील,

 सदरची घटना सहजासहजी मान्य करावयास कुणाचेही मन तयार होणार नाही

 हे निश्चित.


 मात्र 

अशाही घटना कुणाच्या आयुष्यात सेवा निवृत्ती नंतर जर घडत असेल, 

तर 

हे फारच भयानक 

व 

ह्रदयद्रावक चित्र आहे.


  जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस"

        


*हा लेख रिटायर्ड व्यक्तींनी जरुर जरुर वाचावा.*   

🌹🌹

शिवचरित्रमाला भाग - ८६

 🚩 *शिवचरित्रमाला भाग ८६*🚩


*जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात...!*



आरडाओरडा , किंकाळ्या , गर्जना यांचा एकच कल्लोळ गडावर उसळला. सुस्तावलेल्या अन् गाढ झोपलेल्या अन् जागती गस्त घालणाऱ्या त्या मोगली सैन्यावर एकदम धगधगते निखारे येऊन पडावेत असा हा तानाजीचा हल्ला होता. इथे मावळ्यांच्यामध्ये जबर इर्षा होती. आत्मविश्वास होता. आपण जिंकरणारच. पण जर समजा कच खाल्ली तर आपल्याला पळून जायलाही वाट नाही. आपण लढलंच पाहिजे , जिंकलंच पाहिजे , नाहीतर मेलंच पाहिजे , पुन्हा असा डाव खेळताच येणार नाही अन् जगून किंवा मरूनही हे पराभवाचं तोंड महाराजांना अन् जिजाऊसाहेबांना दाखवायचं ? कसं ? पण असला कसला विचारही कोणाच्या मनात येत नव्हता. उदयभानला त्याच्या वाड्यात हा भयंकर हल्ला अकस्मात समजला. इतकी दक्षता घेऊनही हे मराठे गडावर आलेच कसे , पोहोचले कसे हा सवाल आता व्यर्थ होता. उदयभान ढाली तलवारीनिशी धावला. यावेळी मोगली सैनिकांनी मशाली पेटवल्या असतील का ? शक्यता आहे.

अन् प्रत्यक्ष गदीर्त उदेयभान आणि तानाजी घुसले. या अचानक हल्ल्याचा मोगली सैन्यावर नक्कीच परिणाम झाला. बराचसा गोंधळ अन् थोडीफार घबराट. युद्ध कडकडत होते. त्यातच उदयभान आणि तानाजी अचानक समोरासमोरच आले आणि घावावरती घाव एकमेकांवर कोसळू लागले. ही झटापट किती वेळ चालली असेल ? काही सांगता येत नाही. पण प्रत्येक क्षण जगण्या मरण्याच्या तराजूची पारडी खालीवर झुलवीत होता. कुणी कोणाला रेटू शकत नव्हता. कुणी हटतही नव्हता. तेवढ्यात उदयभानचा तलवारीचा कडाडून कोसळलेला घाव तानाजी सुभेदारांच्या ढालीवर पडला. अन् ढालच तुटली. केवढा कल्लोळ! त्याही स्थितीत डोईचं मुंडासं तुटक्या ढालीच्या हातावर घेऊन अन् कमरेचं पटकुरं त्या हातावर गुंडाळीत तानाजी एकांगी लढत होता. उदयभानला जबर हर्ष झाला असेल की , खासा गनीम आता क्षणाक्षणात मारतोच. तो वारावर वार तडाखून घालू लागला. तेवढ्यात ढाल तुटलेल्या हातावर घाव पडला. अन् तानाजीचा हातच तुटला. तरीही रक्त गाळीत उजव्या हातातल्या तलवारीने तो झुंजतच राहिला. दोघंही एकमेकांवर घाव घालीत होते. या क्षणी तानाजी काय ओरडत असेल ? उदयभान काय ओरडत असेल ? इतिहासाला माहीत नाही. पण नक्की गर्जत असतील. अन् एका क्षणी तराजूची पारडी हेलकावली. उदयभानचा तानाजीला अन् तानाजीचा उदयभानला कडाडून धारेचा तडाखा बसला आणि दोघंही भयंकर जखमी , किंबहुना मृत्युच झेलीत एकाचवेळी भुईवर कोसळले. दोघेही ठार झाले. अन् ही गोष्ट अवतीभवतीच्या चार मावळ्यांना दिसली. अन् ते गोंधळलेच. खचलेच. अन् ओरडू लागले. ‘ सुभेदार पडिले , सुभेदार पडिले! ‘ पळा. अन् हाहा म्हणता सुभेदार पडल्याचा रणबोभाट झाला. बरेचसे मावळे धीर खचून ज्या कड्यावरून दोराने ते चढून आले होते , त्या दिशेला धावत सुटले , कड्यावरून उतरण्यासाठी वास्तविक उदयभानही पडला होता ना! पण ती वेळ अशी होती , ती सांगता येत नाही. ती वेळ यमाची. ती वेळ जिवाच्या मायेची. मावळे ओरडत धावत होते. गदीर्त झुंजत असलेल्या सूर्याजी मालुसऱ्यानं हे पाहिले , ऐकलं. त्यानं ओळखलं , अन् तो त्याच दोरांच्याकडे ताडताड धावत सुटला. पोहोचलाही अन् त्याने गडाखाली सोडलेले दोर , जे लोंबत होते , ते तलवारीच्या घावानं ताडताड तोडायला सुरुवात केली. तोडले. अन् तसाच तो वळून पळू पाहणाऱ्या मावळ्यांवर ओरडला , ‘ पळताय भेकडांनो ? तुमचा बाप इथं झुंजता झुंजता पडला अन् तुम्ही कुठं पळताय ? थू तुमच्या जिनगानीवर. हे थोबाड कुणाला दाखविणार आहात ? अरे , तुमी कोणाची माणसं ? महाराजांची ? पळता ? फिरा माघारी! ‘ अन् सूर्याजीनं एकच गर्जना केली. ‘ हर हर हर हर महादेव ‘ पळते होते ते फिरले. सूर्याजीने अन् सर्वांनीच मोगलांच्यावर कडाडून फेरहल्ला चढविला , तो त्या सर्वांच्या दोन हातात जणू आठआठ हातांच्या भवानीचं बळ अवतरल्यासारखाच. या भयंकर हल्ल्यात मोगलांची दाणादाण उडाली. गड मराठ्यांनी जिंकला. असा हा इतिहास. जो सिंहगड पूवीर् आणि नंतरही प्रतिर्स्पध्याशी महिनोन महिने झुंजली. पण हार गेला नाही. तो अजिंक्य गड एका अचानक गनिमी छाप्यात तानाजी , सूर्याजी आणि सर्व मावळे यांनी जीव पणाला टाकून , फारतर दीडदोन तासात जिंकला. गडावरच्या तोफा मुकाट होत्या. मराठ्यांवर एखादीही तोफ उडविण्याची संधी अन् अवसर मोगलांना मिळाला नव्हता. शत्रूच्या तिप्पट फौैजेचा कमीतकमी वेळेत अन् कमीतकमी शस्त्रांंनिशी पूर्ण पराभव मराठ्यांनी केला. हे या असामान्य लढाईचंं असामान्य महत्त्व.

काल्पनिक कादंबऱ्या , कथा , पोवाडे अन् अख्यायिका यांच्या गुंतागुंतीतून सत्य शोधीत शोधीत आपण इथपर्यंत निश्चित येऊन पोहोचतो की , सूर्याजी मालुसऱ्यानं आणि त्याच्या मावळ्यांनी एक फार मोठा राष्ट्रीय मोलाचा धडा रक्तानी लिहून ठेवला की , नेता पडला तरी झुंजायचं असतं. जिंकायचं असतं. सेनापती पडला तरीही! अन् खासा राजा पडला तरीही! हा शिवाजीराजांनी घालून दिलेला आखाडा आणि आराखडा सूर्याजीनं प्रत्ययास आणून दिला , नाहीतर आमची रीत अशी की , नेता , सेनापती किंवा राजा पडला की , सर्वांनी पळत सुटायचं.

महाराजांना केवढं दु:ख झालं असेल याची तुलना सांगायला तराजूच नाही. त्यांच्या तोंडून उद्गार निघाले , ते आज शिलालेखासारखे इतिहासात कोरले मात्र गेले आहेत. ‘ माझा एक गड आला पण माझा दुसरा गड गेला. ‘


– बाबासाहेब पुरंदरे


🚩


*क्रमशः*🚩

रफू - एक कथा

 ✍🏻.... 

*रफू...*


एक 🤝🏼 मित्र भेटला परवा... 

खूप जुना... 

बऱ्याच वर्षांपूर्वी 😡भांडण झालं होतं आमचं... 

नेमकं कारणही 🤔 आठवत नव्हतं मला, इतक्या वर्षांनंतर... 

म्हणाला, "मुद्दामहून भेटायला आलोय तुला... हा योगायोग नाही... क्षुल्लक कारणांमुळे नाती तुटलेल्या सगळ्यांना भेटायचं मी ठरवलंय."_


सुरुवात माझ्यापासूनच होती. कारण, सगळ्यात जास्त किरकोळ कारणावरुन... सर्वात अधिक घट्ट नातं तुटलेल्यांत मी अग्रस्थानी होतो...

अचानकच समोर आल्याने मला माझा अहंकार काही वेळापुरता बाजुला सारता आला नाही... तेव्हढा वेळच नाही मिळाला. 

विचारलं मी त्याला अचानक उपरती होण्यामागचं कारण... चेहऱ्यावर शक्य तेव्हढा भाव 'आलासच ना अखेरीस'_ हा माज ठेऊन. 


तो मला म्हणाला, 

_"दोन महिन्यांपूर्वी मला माझी चूक कळली..._ 

_काॅलेजमध्ये थर्ड ईयरला असताना तू एकदा रफू केलेली पॅन्ट घालून आला होतास..._ 

_ते कोणाला कळू नये म्हणून केलेल्या अवाजवी प्रयत्नात, नेमकं ते माझ्याच लक्षात आलं..._ 

_आणि मग मी त्याचा बाजार मांडायला अजिबात वेळ दवडला नव्हता..._ 

_वर्गात सगळ्यांना सांगून, सगळे तुझ्याकडे अगदी बघून बघून हसतील याचीही सोय केली..._ 

_"त्यानंतर तू मला तोडलंस ते कायमचंच..._ 

_मी किमान वीस वेळा मागितलेली तुझी 🙏🏻माफी दुर्लक्षुन..._ 

_तू त्यावेळी मला म्हणाला होतास, 'देव न करो आणि कधी तुझ्यावर अशी वेळ येवो "..._ 

_ती वेळ माझ्यावर आली... दोन महिन्यांपुर्वी..._ 

_नाही शिवू शकलो मी ते ⏺️भोक..._ 

_नाही करु शकलो रफू..._ 

_नाही बुजवता आलं मला, माझ्याकडचा होता नव्हता तो पैसा आेतून ते एक छिद्र..._ 

*_माझ्या मुलाच्या ❤️हृदयात पडलेलं...!_* 

_ "गेला तो तडफडत मला सोडून, कदाचित मला दुषणं देत"..._ 

_'कसला बाप तू?' अशी खिल्ली उडवत बहुदा मनातल्या मनात..._  

_म्हणूनच आलोय मी तुझ्याकडे..._ 

_आता निदान आपल्या फाटलेल्या नात्याला तरी ठिगळ लावता येईल की नाही बघायला..._ 

_यावेळी तू आपलं नातं *'रफू'* केलेलं पहायला..._ 

_त्यावेळी जेव्हढा हसलो मनापासून खदखदून, तेव्हढंच ह्यावेळी मनापासून हमसून हमसून रडायला लागलो...._ 


सुन्न होऊन ऐकत होतो मी... 

संवेदना जागी असली की वेदनेला मोठ्ठं आंगण मिळतं बागडायला... 

_'देव करो नी तुझ्यावर ही वेळ न येवो',चा असा टोकाचा अर्थ मला अजिबातच अभिप्रेत नव्हता. 

घट्ट मिठी मारली आम्ही एकमेकांना... नी भिजवायला लागलो एकमेकांचे विरुद्ध खांदे. 

'तो' त्याने नकळत केलेल्या _'पापातून'_ अन् 'मी' नकळत दिलेल्या _'शापातून'_ उतराई होऊ बघत होतो... 

मूकपणे एकमेकांची माफी मागू पाहत होतो... 

दोघं मिळून एक नातं, नव्याने *'रफू'* करू पाहात होतो!


तात्पर्य:....

*सर्वांना एकच नम्र विनंती, मनुष्य जन्म एकदाच मिळतो, मिळालेले हे जीवन जास्तीत जास्त सार्थकी लावण्यासाठी सदैव प्रयत्न झाले पाहीजेत, त्यासाठी सर्व नातेसंबंधाना जपा,कुणाचाही अपमान करू नका,कुणालाही क्षुल्लक, क्षुद्र लेखू नका.आपले मित्र नातेवाईक,शेजारी,सहकारी आपले नोकर चाकर हे आर्थिक व सामाजिक परिस्थितीने कमी असले तरी त्यांच्यात कधीच उणे-दुणे काढू नका, त्यांच्यातील कोणत्याच वर्मावर कधीही बोट ठेवून त्यांचा अपमान करू नका. जगात परिपूर्ण कुणीही नाही,आपल्या आचरणांने कुणी दुखावेल व दुरावेल असे शब्द कधीही उच्चारु नका. आपल्या वाणीवर व वर्तनावर सदैव नियंत्रण ठेवा,व कधी अनावधनाने कुणी दुखावलेच तर वेळीच "रफू" करायला विसरू नका*....

पहा विचार करुन...💞💞

बुधवार, १ जून, २०२२

माझी मैना गावावर राहिली - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

 माझी मैना गावावर राहिली


माझ्या जिवाची होतीया काहिली



ओतीव बांधा, रंग गव्हाळा, कोर चंद्राची, उदात्त गुणांची


मोठया मनाची, सीता ती माझी रामाची


हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज कांती


घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची, काडी दवण्याची


रेखीव भुवया, कमान जणू इंद्रधनूची, हिरकणी हिऱ्याची


काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची


मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण


नसे सुखाला वाण, तिच्या गुणांची छक्कड मी गायिली,


माझ्या जिवाची होतीया काहिली..


गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची


झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची


वेळ होती ती भल्या पहाटेची


बांधाबांध झाली भाकरतुकडयाची


घालवित निघाली मला माझी मैना चांदणी शुक्राची


गावदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची


शिकस्त केली मी तिला हसवण्याची


खैरात केली पत्रांची, वचनांची, दागिन्यानं मढवून काढायची


बोली केली शिंदेशाही तोडयाची, साज कोल्हापुरी, वज्रटीक गळ्यात माळ पुतळ्यांची


कानात गोखरं, पायात मासोळ्या, दंडात इळा आणि नाकात नथ सर्जाची


परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची


आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरली मी मुंबईची


मैना खचली मनात, ती हो रुसली डोळ्यात


नाही हसली गालात, हात उंचावुनी उभी राहिली,


माझ्या जिवाची होतीया काहिली.


या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची


मढयावर पडावी मूठभर माती, तशी गत झाली आमची


ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणारांची, मरणारांची, शेंडीची, दाढीची


हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची


बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी, हिरव्या माडीची


पैदास इथं भलतीच चोरांची, ऐतखाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची,


पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, पर्वा केली नाही उन्हाची थंडीची, पावसाची,


पाण्यानं भरलं खिसं माझं, वाण मला एका छत्रीची


त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची


बेळगाव, कारवार, निपाणी, गोव्यासह एकभाषिक राज्याची


 चकाकली संगीन अन्यायाची, फौज उठली बिनीवरची


कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची


उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, वैरी करण्या नामशेष


गोळी डमडमची छातीवर साहिली,


माझ्या जिवाची होतीया काहिली..


म्हणे अण्णाभाऊ साठे, घरं बुडाली गर्वाची, मी-तूपणाची,


जुलुमाची जबरीची तस्कराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची


चौदा चौकडयाचं राज्य रावणाचं, लंका जळाली त्याची


तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि स. का. पाटलाची


अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची


परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाऊन्टनच्या चढाईची


झालं फाऊन्टनला जंग, तिथं बांधुनी चंग


आला मर्दानी रंग, धार रक्ताची मर्दानी वाहिली,


माझ्या जिवाची होतीया काहिली.


महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखविली रीत पाठ भिंतीला लावून लढायची


परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची, गांवाकडं मैना माझी, भेट नाही तिची


तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची


बेळगाव, कारवार, डांग, उंबरगावावर मालकी दुजांची, धोंड खंडणीची


कमाल दंडेलीची, चीड बेकीची, गरज एकीची


म्हणून विनवाणी आहे या शिवशक्तीला शाहीराची


आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका


बिनी मारायची अजून राहिली,


माझ्या जिवाची होतीया काहिली


माझी मैना गावावर राहिली


माझ्या जिवाची होतीया काहिली

- प्रसाद भालेकर , जीवन केशरी मराठी 🚩

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...