Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

बुधवार, १ जून, २०२२

माझी मैना गावावर राहिली - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

 माझी मैना गावावर राहिली


माझ्या जिवाची होतीया काहिली



ओतीव बांधा, रंग गव्हाळा, कोर चंद्राची, उदात्त गुणांची


मोठया मनाची, सीता ती माझी रामाची


हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज कांती


घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची, काडी दवण्याची


रेखीव भुवया, कमान जणू इंद्रधनूची, हिरकणी हिऱ्याची


काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची


मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण


नसे सुखाला वाण, तिच्या गुणांची छक्कड मी गायिली,


माझ्या जिवाची होतीया काहिली..


गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची


झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची


वेळ होती ती भल्या पहाटेची


बांधाबांध झाली भाकरतुकडयाची


घालवित निघाली मला माझी मैना चांदणी शुक्राची


गावदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची


शिकस्त केली मी तिला हसवण्याची


खैरात केली पत्रांची, वचनांची, दागिन्यानं मढवून काढायची


बोली केली शिंदेशाही तोडयाची, साज कोल्हापुरी, वज्रटीक गळ्यात माळ पुतळ्यांची


कानात गोखरं, पायात मासोळ्या, दंडात इळा आणि नाकात नथ सर्जाची


परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची


आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरली मी मुंबईची


मैना खचली मनात, ती हो रुसली डोळ्यात


नाही हसली गालात, हात उंचावुनी उभी राहिली,


माझ्या जिवाची होतीया काहिली.


या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भरती झाली माझी एकाची


मढयावर पडावी मूठभर माती, तशी गत झाली आमची


ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणारांची, मरणारांची, शेंडीची, दाढीची


हडसनच्या गाडीची, नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची


बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी, हिरव्या माडीची


पैदास इथं भलतीच चोरांची, ऐतखाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची,


पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, पर्वा केली नाही उन्हाची थंडीची, पावसाची,


पाण्यानं भरलं खिसं माझं, वाण मला एका छत्रीची


त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची


बेळगाव, कारवार, निपाणी, गोव्यासह एकभाषिक राज्याची


 चकाकली संगीन अन्यायाची, फौज उठली बिनीवरची


कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची


उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, वैरी करण्या नामशेष


गोळी डमडमची छातीवर साहिली,


माझ्या जिवाची होतीया काहिली..


म्हणे अण्णाभाऊ साठे, घरं बुडाली गर्वाची, मी-तूपणाची,


जुलुमाची जबरीची तस्कराची, निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची


चौदा चौकडयाचं राज्य रावणाचं, लंका जळाली त्याची


तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि स. का. पाटलाची


अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची


परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाऊन्टनच्या चढाईची


झालं फाऊन्टनला जंग, तिथं बांधुनी चंग


आला मर्दानी रंग, धार रक्ताची मर्दानी वाहिली,


माझ्या जिवाची होतीया काहिली.


महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखविली रीत पाठ भिंतीला लावून लढायची


परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची, गांवाकडं मैना माझी, भेट नाही तिची


तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची


बेळगाव, कारवार, डांग, उंबरगावावर मालकी दुजांची, धोंड खंडणीची


कमाल दंडेलीची, चीड बेकीची, गरज एकीची


म्हणून विनवाणी आहे या शिवशक्तीला शाहीराची


आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका


बिनी मारायची अजून राहिली,


माझ्या जिवाची होतीया काहिली


माझी मैना गावावर राहिली


माझ्या जिवाची होतीया काहिली

- प्रसाद भालेकर , जीवन केशरी मराठी 🚩

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...