जीवन केशरी मराठी
माहिती संकेतस्थळ, नाशिक
विद्यार्थ्यांच्या हिताच्या अटींसह मविप्र विद्यापीठास जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूहाचा पाठिंबा
नाशिकमध्ये विद्यापीठ स्थापनेसाठी विद्यार्थी प्रतिनिधित्व आणि पारदर्शकतेची मागणी
मराठा विद्या प्रसारक समाजाकडून (मविप्र) नाशिकमध्ये विद्यापीठ स्थापनेचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्याच्या निर्णयाला जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिकने सशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांच्या हितसंरक्षणासाठी आणि दर्जेदार शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी समूहाने काही महत्त्वपूर्ण अटी ठेवल्या आहेत.
समूहप्रमुख कु. प्रसाद अरविंद भालेकर यांनी मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांना पाठवलेल्या विस्तृत पत्रात विद्यापीठाच्या स्थापनेसंदर्भात अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. त्यामध्ये विद्यापीठाचा कारभार पारदर्शक असावा, जात-धर्म-प्रवर्गावर आधारित भेदभाव होऊ नये, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतुदी असाव्यात आणि पूर्ण सुविधा निर्माण झाल्यावरच विद्यापीठ सुरू करावे अशा मुख्य मागण्यांचा समावेश आहे.
विद्यार्थी समूहाच्या मुख्य मागण्या
1विशेष समिती आणि विद्यार्थी प्रतिनिधित्व
विद्यापीठ स्थापनेसाठी स्वतंत्र आणि विशेष समितीची नेमणूक करावी. या समितीत विद्यमान तसेच तत्कालीन विद्यार्थी प्रतिनिधींचा समावेश असावा आणि समितीच्या मतांशिवाय विद्यापीठाशी संबंधित कोणतेही निर्णय घेऊ नयेत.
2राजकीय बदलांपासून स्वतंत्रता
मविप्र संस्था ही सामाजिक संस्था असून तिच्यात पंचवार्षिक निवडणुका होतात. कार्यकारिणी बदलल्यामुळे विद्यापीठाच्या प्रगतीवर नकारात्मक परिणाम होऊ नये यासाठी सातत्य आणि पारदर्शकता टिकवणे आवश्यक आहे.
3आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष तरतुदी
जात-धर्म-प्रवर्ग न पाहता आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण सहज उपलब्ध होईल अशी व्यवस्था करावी. यासाठी विविध फाउंडेशन, संस्था व उद्योग समूहांकडून निधी उभारण्याचा विचार करावा.
4पूर्ण तयारीनंतरच सुरुवात
राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या अर्धवट सुरुवातीसारखी घाई करू नये. विद्यापीठाचे संपूर्ण बांधकाम, सुविधा, पायाभूत सोयी आणि अध्यापनाची गुणवत्ता या सर्व गोष्टी पूर्ण झाल्यावरच शिक्षण सुरू करावे.
5शिक्षणाच्या व्यावसायीकरणावर अंकुश
विद्यापीठाला वित्तीय संस्थेचे स्वरूप देऊ नये. गरीब, गरजू आणि शिक्षण इच्छुक विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा.
समूहप्रमुखांचे विधान
"विद्यापीठ झाल्यास नाशिकमधील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. यात विरोध करण्याचे कारण नाही. परंतु मविप्र प्रशासनाने निःपक्षपातीपणे विद्यार्थ्यांना उच्च व समान शिक्षण द्यावे हीच आमची अपेक्षा आहे."
त्यांनी पुढे भर देत सांगितले की, "आम्ही मविप्र विद्यापीठास पाठिंबा दिला आहे, परंतु हा पाठिंबा पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही तसेच गरीब गरजू व सामान्य कुटुंबातील मुलांना शहरात राहूनच उच्च दर्जाचे शिक्षण प्राप्त करता येईल ही दूरदृष्टी पाहूनच पाठिंबा दिला आहे."
नाशिकच्या विद्यार्थ्यांसाठी फायदे
समूहाने या विद्यापीठामुळे नाशिकच्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या फायद्यांकडे लक्ष वेधले. "गरीब मुलांना शिक्षणासाठी सोयी-सुविधा मिळाव्यात, नाशिकच्या विद्यार्थ्यांना बाहेर भटकंती करावी लागू नये आणि समानतेच्या भावनेतून शिक्षण मिळावे, ह्याच अपेक्षेवर आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे," असे ते म्हणाले.
राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतनचे उदाहरण
विद्यार्थी समूहाने राजर्षी शाहू महाराज तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे उदाहरण देत सावधान केले की अर्धवट बांधकाम असताना महाविद्यालय सुरू केल्यामुळे विद्यार्थी व पालकांना अडचणींचा सामना करावा लागतो आणि संस्थेची प्रतिमाही मलिन होते. संपूर्ण सुसज्ज इमारत बांधकामानंतरच प्रत्यक्ष सुरू करणे अपेक्षित होते.
विद्यार्थी हितावर भर
"विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, त्यांना मविप्र विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी त्रास होणार नाही, नाशिकच्या विद्यार्थ्यांना इतरत्र भटकंती होणार नाही आणि जाती-प्रवर्गावर भेदभाव न करता सर्वांना समान उच्च शिक्षण मिळेल याची काळजी घेतली गेल्यास आमचा पाठिंबा कायम राहील."
समाजाचे लक्ष केंद्रित
यामुळे आता मविप्र विद्यापीठाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या अपेक्षा आणि हित लक्षात घेऊन प्रशासन पुढे कसे पावले टाकते, याकडे नाशिकचे लक्ष लागले आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना, नाशिकला, संस्थेला आणि कर्मवीरांची प्रतिष्ठा उंचावेल असे कार्य अपेक्षित आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा