Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३

 'एक तारीख - एक तास' स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया! 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

मुंबई, दि. २९ : - स्वच्छतेसाठी 'एक तारीख, एक तास' या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.


'स्वच्छता पंधरवडा- स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात 'एक तारीख- एक तास' या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग नोंदवू शकणार आहेत. गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वार्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी विशेष शिबिरे-प्रदर्शने आयोजित केली जातील. ज्यातून स्वच्छतेची गरज, त्यांचे फायदे, महत्व पटवून दिले जाईल.


याबाबतच्या आवाहनात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, स्वच्छता आपल्या सर्वाच्या दैनंदिनीतील महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते अनेक थोर राष्ट्र पुरूष साधू-संतानीही स्वच्छतेबाबत आपल्याला धडे घालून दिले आहेत. याच अनुषंगाने आपल्या सर्वांना 'स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा' हे अभियान यशस्वी करायचं आहे. 'एक तारीख एक तास' या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-२ चा शुभारंभ केला. त्यातून महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा असे ध्येय घेऊन आता वाटचाल करत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्राला अनेक थोरा-मोठ्यांनी परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयीचा मंत्र दिला आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. आता या धड्यांची आपल्याला उजळणी करायची आहे. आपआपल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची आहे. साचलेला कचरा, राडा-रोडा-डेब्रीज हटवायचे आहेत. यात आपल्या सर्वांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासन सज्ज राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे


“स्वच्छता ही सवय आहे. आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगिकारायची आहे. त्याला संस्काराचे रूप द्यायचे आहे. या अभियानानंतर आपल्याला १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही देखील यशस्वी करायची आहे. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात आपल्या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून द्याल. चला महाराष्ट्र कचरा मुक्त करूया. स्वच्छ, सुंदर करूया. आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालूया. स्वच्छतेचा जागर करूया,” असेही मुख्यमंत्र्यानी आवाहन केले आहे


इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका - एकनाथ शिंदे


मुंबई, दि. २९: इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शासनाची भूमिका आहे. इतर मागास समाजाचे महामंडळ, सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय या संस्थांना निधी वाटपात सुसुत्रता आणतानाच सर्व समाज घटकांना समप्रमाणात न्याय देण्यात येईल, केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेची सांगड घालत राज्यात त्याची प्रभावी अंमलबजावणी करून बारा बलुतेदारांना लाभ मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली.


सह्याद्री अतिथीगृह येथे इतर मागास वर्ग तसेच भटके- विमुक्त समाजातील विविध संघटनांसमवेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार सर्वश्री डॉ. संजय कुटे, परिणय फुके, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


सुमारे तीन चास चाललेल्या बैठकीत इतर मागासवर्ग, भटके-विमुक्त, बारा बलुतेदार आदी समाजाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे मांडले.


कुठल्याही समाजाचे आरक्षण कमी करण्याची शासनाची भूमिका नाही, असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले की, मराठा समाजाचे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळवून देताना इतर मागास समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भात निवृत्त न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची कार्यवाही सुरू आहे. राज्य शासन इतर मागास, भटक्या विमुक्त समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. 


राज्यातील 'सारथी', 'बार्टी', 'महाज्योती', 'टीआरटीआय' या संस्थांना निधी देताना कुठलाही भेदभाव होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही देतानाच भटक्या विमुक्तांच्या विविध प्रश्नांबाबत स्वतंत्रपणे बैठक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


 इतर मागास समाजातील विद्यार्थ्य़ांसाठी ७२ वसतीगृहे तातडीने सुरू करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभ देताना नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र असल्यास आठ लाखाच्या मर्यादेच्या प्रमाणपत्राची अट मागे घेण्यासंदर्भात तपासणी करण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.


इतर मागास समाजासाठी ४ हजार कोटी रुपयांच्या योजना- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


राज्य शासनाच्या माध्यमातून इतर मागास समाजासाठी सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले. 

केंद्र शासनाने ओबीसी आयोगाला संविधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून वैद्यकीय प्रवेशामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याचा निर्णयही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले. राज्य सरकार इतर मागास समाजावर अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.


भटक्या विमुक्त समाजाला भरघोस निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

राज्यातील भटक्या विमुक्त समाजाला आणि त्यातील दुर्लक्षित घटकांना भरघोस निधी देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. 

कोणत्याही घटकाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असे सांगतानाच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय यांना निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही श्री. पवार यांनी सांगितले.


यावेळी मंत्री श्री. भुजबळ यांच्यासह श्री. शेंडगे, श्री.तडस, डॉ. तायवाडे, श्री. बावकर, श्री. पडळकर, लक्ष्मणराव गायकवाड, पल्लवी रेणके, मंगेश ससाणे, विश्वनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 


बैठकीस राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, सचिन राजुरकर, पुरुषोत्तम प. शहाणे (पाटील), शरद वानखेडे, सुभाष घाटे, नरेश बरडे, शकील पटेल, दिनेश चोखारे, प्रकाश भगरथ, भालचंद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३

गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात गणरायाला निरोप

विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव

 मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ

 शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 यांच्याकडून पुष्पवृष्टी




मुंबई, दि. २८ - अनंत चतुर्दशीनिमित्त गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी आलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकींवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पवृष्टी केली. यावेळी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” च्या घोषणांनी सगळा परिसर दुमदुमून गेला.

पालकमंत्री दीपक केसरकर, पर्यटनमंत्री गिरीश महाजन, खासदार सुनील तटकरे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंडपात आगमनापूर्वी सुवासिनींनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांचे ओवाळून औक्षण केले. तसेच 
आयुक्त डॉ. चहल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 
 
गिरगाव चौपाटीवर आज सायंकाळपासून भाविकांचा जनसागर जमला होता. दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात येत आहे. 



बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुंबईत विविध ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेश मूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. मान्यवरांनी यावेळी उपस्थित असलेल्या विविध देशांच्या दूतावासाच्या प्रतिनिधींची भेट घेतली.

देश-विदेशातील पर्यटकांना गणेश विसर्जन सोहळ्याचे दर्शन घडविण्यासाठी पर्यटन विभागाने आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाअंतर्गत उभारलेल्या विशेष 'गणेश दर्शन' गॅलरीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी भेट दिली. हा सोहळा अनुभवण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या विदेशी पर्यटकांशी संवाद साधला. पोलीस दलाच्या मंडपालाही भेट देऊन त्यांनी तेथून गणेश भक्तांना अभिवादन केले.

बुधवार, २७ सप्टेंबर, २०२३

 मौजे सुकेणे विद्यालयात

 गणरायांना भावपूर्ण निरोप

 विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप



मौजे सुकेणे विद्यालयात गणरायांना भावपूर्ण निरोपाप्रसंगी आरती करताना संस्थेचे उपसभापती डी बी मोगल, प्राचार्य रायभान दवंगे सेवक व विद्यार्थी 



कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २७ - मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात  नवव्या दिवशी गणरायांना कलामंचच्या मिरवणुकीसह भावपूर्ण निरोप देण्यात आला  सुरुवातीला मविप्र संस्थेचे उपसभापती डी बी अण्णा मोगल, प्राचार्य रायभान दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे यांच्यासह सर्व विद्यार्थी व सेवकांनी गणरायाची आरती केली व उत्साहपूर्ण वातावरणात गणरायांना निरोप देण्यात आला सुरुवातीला विद्यालयातील सर्व शिक्षकांनी निधीचे संकलन करत  बालवाडीच्या  विद्यार्थ्यांपासून ते ज्युनिअर कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले शिस्तबद्ध रीतीने दोन हजार विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे स्नेहभोजन देण्यात आले .

शालेय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप


दुपारी चार वाजता संगीत मंचच्या पथकाच्या सहाय्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला या मिरवणुकीत ९ वीच्या सर्व मुला-मुलींनी सहभागी होत गणरायांना घोषणा पूर्ण वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला याप्रसंगी प्राचार्य दवंगे उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षिका संगीता सोनवणे, संगीत शिक्षक रामेश्वर धोंगडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्गाने परिश्रम घेतले

 ‘वर्षा’ येथील श्री गणेश दर्शनाने

 भारावले विदेशी पाहुणे !

३० हून अधिक देशांच्या वाणिज्यदूत, मान्यवरांची उपस्थिती




मुंबई, दि. २७ :- ‘गणपती बाप्पा मोरया' चा जयघोषाचा निनाद, श्री गणेशांचे उत्सवाच्या निमित्ताने सजलेले रुप आणि आरती-मंत्रोच्चार अशा भारावलेल्या भक्तीपूर्ण वातावरणात विविध देशातील पाहुण्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी प्रतिष्ठापित श्री गणेशांचे मनोभावे दर्शन घेतले. मुंबईतील विविध देशांच्या वाणिज्य दूतावासांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर हे ते विदेशी पाहुणे होते. यात रशियाच्या सेंट पीटसबर्गचे उपप्रांतपाल व्लादिमीर क्याजिनीन यांच्यासह तब्बल ३० हून अधिक देशातील विदेशी पाहुण्यांचा समावेश होता. 



अफगणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बहारिन बेलारूस, फिनलँड, हंगेरी, इस्त्रायल, जपान, कोरिया, मॉरिशस, पोलंड, सिंगापूर, स्पेन, टर्की, बांग्लादेश, ग्रेट-ब्रिटन, चीन, इराण, आर्यलंड, इटली, रशिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, थायलंड, संयुक्त अरब अमिरात, व्हिएतनाम, युगांडा, कोलंबिया, केनिया, युक्रेन या देशांच्या वाणिज्य दूतावास प्रमुख, वरिष्ठ अधिकारी वर्षा शासकीय निवासस्थानी आवर्जून भेट दिली. श्री गणेश दर्शनानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले. त्यांच्याशी दिलखुलास संवादही साधला. याच दरम्यान इर्शाळवाडीतील मुलांच्या हस्ते आरतीही करण्यात आली. या मुलांच्या अनुषंगाने माहिती घेतानाच, या विदेशी पाहुण्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संवेदनशीलतेलाही दाद दिली. 


श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतानाच या सर्व विदेशी पाहुणे मंडळींनी श्री गणेश पूजाविधीची आवर्जून माहिती घेतली. यानिमित्ताने वर्षा करण्यात आलेले स्वागत आणि भक्तीपूर्ण, उत्साही वातावरण याबाबतही या विदेशी पाहुण्यांनी आनंद आणि समाधानाच्या उत्स्फूर्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या.

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३

 स्वच्छता अभियानाला ‘लोकचळवळीचे स्वरूप मिळावे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


जीवन केशरी मराठी वृत्तसेवा: 

राज्यात १ ऑक्टोबर रोजी राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेसाठी एक तारीख - एक तास’ उपक्रमाच्या आयोजनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. ‘स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि नगर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे. या अभियानाला चळवळीचे स्वरूप आले पाहिजे. स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा, असे आवाहन करतानाच राज्यात दि. १५ डिसेंबर २०२३ पर्यंत ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ राबविण्यात येणार असून लोकसहभागातून त्या स्पर्धा यशस्वी कराव्यात असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले. 


या अभियानासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देतो. वर्षभरापूर्वी राज्यात ‘स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-२’ चा शुभारंभ केला. महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा हे आपलं उद्दिष्ट्य आहे. स्वच्छतेच्या मंत्राची पंरपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालयाने दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ या काळात स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात हा उपक्रम यशस्वी करायचा असून त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. 


महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीच्या बाहेरचा भागात नेहमी कचऱ्याचे ढीग, डेब्रिज टाकलेले असते. अशा महापालिका हद्दीबाहेरच्या जागा शोधून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहिम राबवावी त्यासाठी मुख्य सचिवांनी आढावा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.


‘स्वच्छता हीच सेवा’ हे अभियान महत्वाचे आहे. स्वच्छता फक्त कागदावर ठेऊ नका. प्रत्यक्ष फिल्डवर त्याचे काम दिसले पाहिजे. या उपक्रमात आपण १ ऑक्टोबरला आपापल्या गावात, शहरात, प्रत्येक वार्डात, प्रत्येक क्षेत्रात सकाळी १० वाजेपासून स्वच्छता मोहीम राबवावी. प्रत्येक वॉर्डात दोन ठिकाणी आणि ग्रामपंचायतीत एका ठिकाणी मोहीम राबविताना त्या त्या भागातील सर्व नागरिकांना सहभागी करून घ्यावे, जिथे खरोखरच कचरा आहे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष झालेले आहे, अशा जागा शोधून काढा, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले.


अभियानांतर्गत सफाई मित्र, सुरक्षा शिबिरे आयोजित करून स्वच्छतेची गरज त्याची फायदे याचे महत्व पटवून द्या. एक तासाचे हे अभियान प्रतिकात्मक असून श्रमदानासाठी नागरिकांना सहभागी करून घ्यावे पण आपल्याला प्रशासन म्हणून स्वच्छतेचे काम दररोजच करायचे आहे असे सांगत अभियानानंतर १५ डिसेंबर २०२३ पर्यंत ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ यशस्वी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक कायम राहण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणेने ‘मिशन मोड’वर काम करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

 महाराष्ट्राच्या सागरी सुरक्षेसाठी तट रक्षक दलास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे




भारतीय तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर महानिरीक्षक मनोज बाडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या सागरी भागातील सुरक्षा उपाययोजनांसाठी महाराष्ट्र शासनाकडून भारतीय तटरक्षक दलाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे मुख्यमंत्र्यानी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्राचे कमांडर तथा महासंचालक अनुराग कौशिक, निवृत्त कमांडर मिलिंद पाटील आदी उपस्थित होते. 

या भेटीत श्री. बाडकर यांच्यासह शिष्टमंडळाने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना महाराष्ट्रातील सागरी भागातील सुरक्षा उपाययोजनांची माहिती दिली. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी येथील हवाई सुरक्षा सुविधांचा आढावा सादर केला. विशेषतः वरळी येथील सुविधांचे तात्काळ अद्ययावतीकरण आवश्यक असल्याचे सांगितले. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वरळीसह, राज्यातील सागरी परिक्षेत्रात तट रक्षक दलासाठी आवश्यक अशा सोयी-सुविधा उभारणी करिता महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...