नाशिक:- यंदाचे नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे. शिक्षण विभागाने यासंबंधीत ठोस पावले उचलली आहेत. प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी शिक्षण विभागाने यंदा अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. असे स्पष्टीकरण शिक्षण मंडळाने दिले होते.
इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. १९ व २० मे रोजी प्रवेश प्रक्रियेचा सराव म्हणून संकेतस्थळ सुरू होते. प्रत्यक्ष अर्ज नोंदणी २१ मे ते २८ मे २०२५ दरम्यान होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. १९ व २० मे दरम्यान संकेतस्थळावर दाखल झालेले अर्ज आणि विद्यार्थी नोंदणीचा डाटा २० मे रोजी सायंकाळी ६ वाजेनंतर काढून टाकण्यात येणार होता आणि २१ मे रोजी स. ११ वाजेनंतर प्रत्यक्ष अर्ज नोंदणी सुरू होणार होती.
परंतु आज दि. २१ मे २०२५ रोजी दु. २ वाजेपर्यंत सुद्धा संकेतस्थळ मात्र बंद असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला आहे.
अनेकांनी सर्व्हर डाऊन तर काहींनी संकेतस्थळावर सायबर हल्ला झाल्याने संकेतस्थळ बंद असल्याचा अंदाज वर्तवला. तसेच काही सायबर केंद्रामध्ये संकेतस्थळ बंद असतांना सुद्धा बनावट संकेतस्थळावर अर्ज भरणा करून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करत असल्याची धक्कादायक माहिती सुत्रांनी दिली आहे.
परंतु संकेतस्थळावर सायबर हल्ला किंवा सर्व्हर डाऊन आदी असे काहीही झालेले नसून, विद्यार्थी व पालकांना इयत्ता अकरावी प्रवेश अर्ज दाखल करतांना तसेच विद्यार्थी नोंदणी करतांना, कागदपत्रे सादरीकरण करतांना, प्रवेश अर्ज शुल्क भरणा करतांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी संकेतस्थळाची रचना ही युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच संकेतस्थळ विद्यार्थी व पालकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर काहीही अडचण निर्माण होऊ नये ह्याची खबरदारी प्रशासन घेत आहेत. नागरीकांनी व विद्यार्थीनी अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रवेश अर्ज भरणा करावा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा