
डिजिटल इंडिया च्या उपक्रमाला भ्रष्टाचाराची वाळवी? ‘आपले सरकार’ पोर्टलला पर्याय म्हणून दलालीचा गोरखधंदा फोफावतोय!
नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आपले सरकार’ हे पोर्टल सुरू केलं. या पोर्टलच्या माध्यमातून जात, उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमिलेअर, इ. शासकीय दाखले मिळवण्यासाठी फक्त ₹३३.६० इतकं माफक शुल्क आकारलं जातं. तसेच शासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे १५ दिवसांचा कालावधी लागतो.
मात्र प्रत्यक्षात ही प्रक्रिया तितकी पारदर्शक राहिलेली नाही. अनेक सेतु कार्यालये व खासगी सेवा केंद्रे दाखले मिळवून देण्यासाठी नागरिकांकडून ₹४०० ते ₹५०० पर्यंतची रक्कम आकारतात. एवढंच नाही, तर या व्यवहारांमध्ये तहसीलदार, तलाठी यांसारख्या शासकीय अधिकाऱ्यांचाही ‘कमिशन’ स्वरूपात सहभाग असल्याची चर्चा आहे.
कमी कागदपत्रे असलेल्यांची अडचण, दलालांची संधी!
नागरिकांकडे काही आवश्यक कागदपत्रे नसल्यास, ‘आपले सरकार’ पोर्टलवर अर्ज करताना अडथळे येतात. अशावेळी दाखला लवकर मिळावा म्हणून नागरिक हे सेवा केंद्र, सेतु कार्यालय यांच्याकडे वळतात. तेथे त्यांना अतिरिक्त रक्कम भरावी लागते, पण काम काही दिवसांत होते.
एका नागरिकाने सांगितले की, “जे कागदपत्रे मी सेवा केंद्रात दिली, तेच जर पोर्टलवर दिले असते, तरी माझा अर्ज मंजूर होईल का? लवकर दाखला मिळेल का ? यामुळे ऑनलाईन अर्ज न करता सेतु कार्यालयात अक्कलखाती पैसे देऊन दाखला मिळावावा लागतोय” यावरून जनतेचा प्रशासनावरील अथवा प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरील विश्वास डगमगतोय, हे स्पष्ट दिसते.
योजनेच्या हंगामात दलालांची 'दिवाळी'
शालेय प्रवेश, महाविद्यालयीन दाखले, सरकारी योजना – या काळात सेवा केंद्र व सेतु कार्यालयांची कमाई अक्षरशः 'फुलते'. गरजूंना वेळेवर दाखले मिळावेत म्हणून अधिक पैसे मोजावे लागतात. यामुळे शासनाच्या 'डिजिटल इंडिया' उपक्रमाचा हेतूच हरवत चालला आहे.
नेमकं घडतंय काय?
- शासकीय सेवा खासगी दलालांकडे सरकत आहेत.
- पारदर्शकतेचा अभाव आणि दलालीला उत्तेजन.
- सामान्य नागरिक आर्थिक शोषणाला बळी पडतोय.
- प्रशासनावरील लोकांचा विश्वास ढासळतोय.
शासनाने दिलेल्या डिजिटल सेवा सुविधा ह्या प्रत्येक नागरिकापर्यंत सरळ, सुलभ आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने पोहचणं अपेक्षित होतं. मात्र आज प्रत्यक्षात पैशांच्या मोबदल्यात दाखले मिळवणं ही गरज झाली आहे, हक्क नव्हे.
आमची WhatsApp ग्रुप लिंक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा