धान्य वितरणातील अनागोंदी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आंदोलन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली धान्य वितरण कार्यालयातील अनागोंदी कारभाराच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील रेशनिंग व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक शिधा पत्रिकांमध्ये ऑनलाईन नावे दिसत नसल्यामुळे नागरिकांना KYC अथवा बायोमेट्रिक कारणास्तव वारंवार चकरा माराव्या लागत आहेत.
अनेक रेशन दुकानांतून ऑनलाईन नावे असतानाही कमी प्रमाणात व निकृष्ट दर्जाचे धान्य दिले जात आहे. प्रत्येक दुकानात मोफत KYC व बायोमेट्रिक सुविधा उपलब्ध असताना देखील काही दुकानदार नागरिकांकडून पैसे मागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.
धान्य वितरण कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट असून त्यांच्यामार्फत पैसे देऊन त्वरित काम होत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वर डाऊनची कारणे देत नागरिकांना वेळेवर धान्य मिळत नाही. शिधा पत्रिका बंद झाल्यानंतर अनेक वेळा अर्ज करूनही नव्या पत्रिका मिळत नाहीत.
पंचवटी भागातील मोरे मळा, हनुमानवाडी, क्रांती नगर, उदय कॉलनी या परिसरातील रेशन कार्ड्स सुमारे ३ किमी अंतरावरील शनिमंदिर पेठरोड परिसरातील दुकानांशी जोडण्यात आले आहेत. परिणामी, मोफत धान्य घेण्यासाठी नागरिकांना सुमारे ₹२०० पर्यंतचे रिक्षा भाडे सहन करावे लागत आहे. म्हणून हे रेशन दुकान क्रांतीनगर परिसरात सुरू करावे, किंवा नागरिकांची कार्डे त्यांच्या जवळील दुकानांशी जोडावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
धान्य वितरण कार्यालयातील अनागोंदी कारभार तत्काळ थांबवून नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आठवड्यातून एकदा कॅम्प लावून त्यांची कामे मार्गी लावावीत, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
उपस्थित मान्यवर
जिल्हाध्यक्ष ॲड. सुरेश आव्हाड, ॲड. शाम तावरे, ॲड. संदीप दंडगव्हण, ॲड. विलास डोंगरे, चेतन सोनवणे, ॲड. ज्योती साळवे, भास्कर आवारे, बाबुराव साठे, पंढरीनाथ बागुल, निलेश वराडे, ॲड. प्रतीक्षा चौधरी, ज्योती जाधव, अशोक श्रीखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा