संविधान दिनाचा अमृतमहोत्सव जनता विद्यालयात उत्साहात साजरा
नाशिक, दि. २६ नोव्हेंबर:- मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता विद्यालयात आज ( दि. २६ ) रोजी संविधान दिनाचा भव्य समारंभ पार पडला. शाळेच्या गोरेराम लेन परिसरात आयोजित या कार्यक्रमात संविधानाच्या मूलभूत तत्त्वांचा गौरव करण्यात आला.
सकाळी ७:१५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अर्पण केलेल्या पुष्पांजलीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. वाय.बी.गायधनी आणि संपूर्ण शिक्षक वर्गाने संविधानाचे पूजन केले.
कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे संविधानाच्या उद्देशिकेचे भावपूर्ण वाचन. इयत्ता दहावीच्या विद्यार्थी कु. प्रसाद भालेकरने उपस्थितांना संविधानाबाबत सखोल माहिती देत त्याचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संविधानावर आधारित अत्यंत परिणामकारक संवाद साधला.
या कार्यक्रमाचा एक अविस्मरणीय क्षण म्हणजे मुंबई दहशतवादी हल्ल्यातील निरपराध शहीदांना अर्पलेली श्रद्धांजली. उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांना सन्मान दिला.
इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी या पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते. त्यांना वर्गशिक्षिका एस.बी.जाधव आणि शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती एस.एम.गायखे यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाद्वारे शाळेने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयास केला.
याप्रसंगी शाळेच्या सर्व शिक्षिका , विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा