Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

 मनपा प्रशासन कधी सुधरणार ; गरीबांच्या ताटातले‌ ओढायचे कधी थांबणार? 

नाशिक महानगरपालिका हद्दीतील अंगणवाडी सेविकांचे तीन महिन्यांचे मानधन थकित 




नाशिक, १४ ऑगस्ट २०२४ - नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभे ठाकले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे मानधन थकल्याने, आगामी रक्षाबंधणाच्या सणाची तयारी करणे त्यांच्यासाठी अवघड झाले आहे.

वार्षिक मुदतवाढ मंजूर झाली असूनही मानधन अद्याप वितरित करण्यात आलेले नाही. हे चित्र नवीन नसले तरी, यंदाच्या परिस्थितीने अनेकांच्या चिंतेत भर घातली आहे. दरवर्षी मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत असली तरी, यावेळी परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

या कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांश गरीब आणि विधवा महिला असून, त्या अनेक महत्त्वाची कामे करतात. सर्वेक्षण, लसीकरण मोहीम, मतदान यासारख्या जबाबदाऱ्या त्या नेहमीच कुशलतेने पार पाडतात.

थकीत मानधनामुळे अनेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. काहींना कर्ज काढावे लागले आहे, तर अनेकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कमी करावा लागला आहे.

दरम्यान, नाशिकमधील नागरिकांमध्ये या परिस्थितीबद्दल नाराजी पसरली आहे. अंगणवाडी सेवा ही बालविकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून, त्यातील कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

रक्षाबंधनाच्या आधी मानधन मिळेल की नाही, याबद्दल अनिश्चितता कायम असली तरी, अंगणवाडी कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडण्यास कटिबद्ध आहेत. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता लपवता येत नाही. नाशिकमधील या परिस्थितीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नाशिक महानगरपालिकेकडून दरवर्षी महिलांना मानधन देण्याच्या बाब टाळली जाते. अनेक महिलांचे घर हे अंगणवाडी च्या मानधनावर चालत आहे. अंगणवाडी सेविका ह्यांचे मानधनही अतिशय तुटपुंज्या स्वरूपाचे आहे. ह्या मानधनाच्या दहापट वेतन असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळते परंतु अंगणवाडी सेविकांवरच नेहमी अन्याय का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...