Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

गुरुवार, २९ ऑगस्ट, २०२४

 मौजे सुकेणे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन प्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी ,पर्यवेक्षक नितीन भामरे व आदी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता,२९- मौजे सुकेणे ता निफाड येथील मविप्र संचलित कर्म रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज येथे राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी, पर्यवेक्षक नितीन भामरे व उपस्थितांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले शिक्षकांच्या वतीने क्रीडा शिक्षक बाळासाहेब गडाख यांनी मेजर ध्यानचंद यांच्या कार्याची ओळख करून दिली यावेळी अध्यक्षिय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी मेजर ध्यानचंद त्यांचे हॉकी विषयीचे कार्य विशद केले सूत्रसंचालन दिलीप काळे यांनी तर आभार रामेश्वर धोंगडे यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व सेवक व विद्यार्थी उपस्थित होते


शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

 मनपा प्रशासन कधी सुधरणार ; गरीबांच्या ताटातले‌ ओढायचे कधी थांबणार? 

नाशिक महानगरपालिका हद्दीतील अंगणवाडी सेविकांचे तीन महिन्यांचे मानधन थकित 




नाशिक, १४ ऑगस्ट २०२४ - नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभे ठाकले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे मानधन थकल्याने, आगामी रक्षाबंधणाच्या सणाची तयारी करणे त्यांच्यासाठी अवघड झाले आहे.

वार्षिक मुदतवाढ मंजूर झाली असूनही मानधन अद्याप वितरित करण्यात आलेले नाही. हे चित्र नवीन नसले तरी, यंदाच्या परिस्थितीने अनेकांच्या चिंतेत भर घातली आहे. दरवर्षी मानधनासाठी प्रतीक्षा करावी लागत असली तरी, यावेळी परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

या कर्मचाऱ्यांमध्ये बहुतांश गरीब आणि विधवा महिला असून, त्या अनेक महत्त्वाची कामे करतात. सर्वेक्षण, लसीकरण मोहीम, मतदान यासारख्या जबाबदाऱ्या त्या नेहमीच कुशलतेने पार पाडतात.

थकीत मानधनामुळे अनेक अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण झाले आहे. काहींना कर्ज काढावे लागले आहे, तर अनेकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कमी करावा लागला आहे.

दरम्यान, नाशिकमधील नागरिकांमध्ये या परिस्थितीबद्दल नाराजी पसरली आहे. अंगणवाडी सेवा ही बालविकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून, त्यातील कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

रक्षाबंधनाच्या आधी मानधन मिळेल की नाही, याबद्दल अनिश्चितता कायम असली तरी, अंगणवाडी कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडण्यास कटिबद्ध आहेत. मात्र, त्यांच्या चेहऱ्यावरील चिंता लपवता येत नाही. नाशिकमधील या परिस्थितीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नाशिक महानगरपालिकेकडून दरवर्षी महिलांना मानधन देण्याच्या बाब टाळली जाते. अनेक महिलांचे घर हे अंगणवाडी च्या मानधनावर चालत आहे. अंगणवाडी सेविका ह्यांचे मानधनही अतिशय तुटपुंज्या स्वरूपाचे आहे. ह्या मानधनाच्या दहापट वेतन असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळते परंतु अंगणवाडी सेविकांवरच नेहमी अन्याय का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 लाडकी बहीण योजनेचे लाभ हवेत, पण आधार लिंक नाही ! 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: बँकांचा घोळ लाभार्थींना डुबवतोय; ऑनलाईन सेवांची गरज ठळक



सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू असून  त्यासाठी अनेक सरकारी दस्तावेज तयार करणे , बॅंकांसंबंधीचे कामे होत आहेत. परंतु हया योजनेमध्ये पात्र महिलांना एक मोठा धक्का बसला आहे. आणि ह्या धक्क्यामुळे अनेक नागरिकांनी प्रशासनाच्याच कार्यप्रणालीवर टीका केली आहे. 

या योजनेकरीता बॅंक खाते आधार सोबत लिंक असणे गरजेचे असल्याची अट आहे. अनेक महिलांनी कागदपत्रांची पूर्तता केली, अर्ज भरले परंतु त्यांचे काम झाले नाही. आधार बॅंक खाते सोबत लिंक झाला नाही. यामुळे ह्या संबंधीचा दोष भारत सरकारचाच आहे. असे नागरीकांचे म्हणणे आहे . सरकाराने डिजिटल इंडिया ची संकल्पना राबवत ऑनलाईन मनी ट्रान्स्फर, इंटरनेट बॅंकींग, कॅशलेस इंडिया ची सुरूवात केली त्याच पद्धतीने ज्या ज्या सेवा अत्यावश्यक आहेत त्या सुविधा ऑनलाईनरीत्या सुद्धा सुरू करणे गरजेचे होते यामुळे नागरीकांना बॅंकांबाहेर रांगेत उभे राहावे लागले नसते परंतु तीच बाब सद्यस्थिती मध्ये घडून आल्यानंतर नागरीकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे ‌. 

युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवर आधार सीडींग ह्या टॉपिकवर सर्वच व्हिडिओ ट्रेंड्स मध्ये आहे परंतु नागरिकांनी व्हिडिओ क्रिएटर्सवर सुद्धा संताप व्यक्त केला आहे. त्या व्हिडिओ मध्ये दाखविल्याप्रमाणे NPCI द्वारे आधारकार्ड बॅंक खात्यांना ऑनलाईन पद्धतीने लिंक होते परंतु ते फक्त Bank of Baroda, Indian Bank, Indian Overseas Bank, Karnataka Bank ह्यासाठीच लागू आहे. यामुळे SBI , BANK OF INDIA यांसारख्या नामांकित व सरकारी बॅंकाचे नाव नसल्याने व ऑनलाईन सुविधा नसल्याने सरकारी प्रणालीवरच नागरिकांनी द्वेष व्यक्त केला आहे. 

SBI सारख्या सरकारी बँकांच्या गैरकारभारामुळे अनेक महिला या महत्त्वाकांक्षी योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. कागदपत्रांची संपूर्ण पूर्तता करूनही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक न केल्याने हजारो महिलांचे आर्थिक नुकसान होत आहे.

अनेक महिलांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केली असतानाही, बँक अधिकाऱ्यांनी त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अधिकाऱ्यांनी मौखिक पद्धतीने "हो" म्हटल्यानंतर, विशेषतः कमी शिक्षित आणि प्रक्रियेबद्दल कमी माहिती असलेल्या महिलांनी, अधिक प्रश्न न विचारता आपले काम पूर्ण झाले असे समजून घरी परतल्या. मात्र, प्रत्यक्षात त्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडले गेले नाही, ज्यामुळे त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत.

या समस्येवर उपाय म्हणून तज्ञांनी बँकांमधील सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याची गरज व्यक्त केली आहे. "आधार लिंकिंगसारख्या महत्त्वाच्या सेवा ऑनलाईन उपलब्ध असल्या तर अशा प्रकारच्या समस्या टाळता येतील," असे एका बँकिंग तज्ञाने सांगितले. ऑनलाईन सेवांमुळे प्रक्रिया पारदर्शक होईल आणि ग्राहकांना त्यांच्या अर्जाची स्थिती सहज तपासता येईल.

एका बाजूला सरकार डिजिटल इंडियाचा जयघोष करत असताना, दुसरीकडे बँकांच्या अकार्यक्षमतेमुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पैसे पाठवण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध असूनही, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्यासाठी मात्र अजूनही ऑफलाइन पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे. या विरोधाभासामुळे अनेक खातेधारक चिंतेत आहेत.

केवळ SBI नव्हे तर इतर सरकारी व खासगी बँकांमध्येही हाच प्रकार दिसून येत आहे. ग्राहकांना सुविधा देण्यात या वित्तीय संस्था पूर्णपणे अपयशी ठरल्या आहेत. बँकांचे अनेक दूरध्वनी क्रमांक असले तरी त्यापैकी बहुतांश बंद असतात, तर काही सुरू असलेल्या क्रमांकांवर कोणीही प्रतिसाद देत नाही.


भारत कॅशलेसही आणि लाभलेसही !


सरकारच्या मोठ्या घोषणांच्या मागे लपलेली ही कटू वास्तविकता आहे. एका बाजूला डिजिटल इंडियाचा गौरव केला जात असताना, दुसरीकडे सामान्य नागरिक मात्र कॅशलेस आणि लाभलेस अशा दुहेरी संकटात सापडले आहेत. 

प्रश्न उपस्थित होतो - भारताने खरोखर विकास केला आहे का? की केवळ कागदोपत्री आकडेवारीत बदल झाला आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे, अन्यथा 'विकसित भारत' ही संकल्पना केवळ स्वप्नवत राहील.


बँकांनी त्वरित सर्व सेवा ऑनलाईन करणे आणि प्रक्रिया सुलभ करणे आवश्यक आहे. तसेच, सरकारने या योजनांच्या अंमलबजावणीवर कडक देखरेख ठेवणे गरजेचे आहे. केवळ तेव्हाच खऱ्या अर्थाने 'डिजिटल इंडिया' आणि 'विकसित भारत' या संकल्पना साकार होतील. 

महिलांनी घ्यायावयाची दक्षता : महिलांनी सर्वप्रथम https://www.uidai.gov.in ह्या वेबसाईटवर जाऊन आपले आधार सिडींग स्टेटस तपासावे व नंतर बॅंकेत जाऊन विचारणा करून कागदपत्रे जमा करून खात्री करून‌ घ्यावी. 

शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

 म. न. पा. कार्यालयात ठिय्या आंदोलन



नाशिक ता. १० , :- म.न.पा. कार्यालय राजीव गांधी भवन येथे अधिकारी वेळेत उपस्थित नसल्याने निवेदन देण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल च्या पदाधिकार्यांना दुपारी दोन वाजे पर्यंत निवेदन देण्यासाठी अधिकार्यांची वाट पाहवी लागल्याने पदाधिकार्यांनी ॲड.सुरेश आव्हाड यांच्या नेत्रुत्वाखाली अति. आयुक्त यांच्या दालना मधेच ठिया आंदोलन केल्याने व अधिकार्यांच्या नावाने घोषणा दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी उशिरा आलेल्या अधिकार्यांना धारेवर धरत हे कार्यालय सर्वसामान्यांसाठी आहे की नाही? असा जाब विचारत घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने अति.आयुक्त स्मिता झगडे यांना निवेदन देण्यात आले.


म.न.पा.च्या अतिक्रमण विभागाकडून हॅाकर्स ,पथविक्रेते यांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या स्ट्रीट वेंडर्स (प्रोटेक्शन ॲाफ लाव्हलीहुड ॲण्ड रेगुलेशन ॲाफ स्ट्रीट वेंडींग)अधिनियम २०१४चे कायद्यास केराची टोपली दाखवत असुन गरीब हॅाकर्स व पथविक्रेत्यांवर बळजबरीने कारवाई करत आहेत.कायद्या मधे हॅाकर्स व पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना जागा मिळवून दिल्या खेरीज कोणावरही अतिक्रमणाची कारवाई करण्यात येऊ नये असे स्पष्ट उल्लेख असतांना देखील अनेक भाजीविक्रेते,पथविक्रेते यांचे सर्वेक्षण झालेले नाहीत व ज्यांचे सर्वेक्षण झालेले आहेत अशा हॅाकर्सना परवाणगी देऊन लायसन्स देण्यात आलेले आहेत.त्यांना कायदेशीर नोटीस दिल्या नंतरच कारवाई करण्यात यावी असे स्ट्रीट वेंडर कायद्याच्या कलम १८ मधे नमूद असतांना देखील काही हातगाडी चालकांवर कायद्याचे पालन न करता पश्चिम विभागाचे अधिकारी यांनी सुडबुध्दीने कारवाई केली असुन कुठल्याही प्रकारची नोटीस न देता साहित्य जप्त करण्यात आलेले आहेत.सदरील अतिक्रमणाची कारवाई करतांना राञी ७:०० वा.कारवाई करण्यात आली असुन जप्त मालाचा पंचनामा न करताच केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याने अशा घटणेचा निषेध राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी नोंदविला.सदरील बेकायदेशीर क्रुत्याची चौकशी करण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी अति.आयुक्त स्मिता झगडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. शहरातील गरीब हॅाकर्स,भाजी विक्रेते,पथविक्रेते यांच्यावर सुरु असलेली बेकायदेशीर कारवाई त्वरित थांबविण्यात यावी व फेरीवाला समितीची स्थापना करण्यात येऊन अशा पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यात येऊन त्यांना हक्काची जागा देण्यात यावी.स्ट्रीट वेंडर्स कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.अशा आशयाचे निवेदन देण्यात येऊन सदरील मागण्यांचा विचार न झालास अधिक तिव्र जनांदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांनी दिला.

यावेळी ॲड.सुरेश आव्हाड,हाजी मोहिय्योद्दीन शेख,अंतोष धाञक,भास्कर धुमाळ,स्मिता मराठे,कैलास सोनवणे,रेखा सोनवणे,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०२४

लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मानवंदना


 “माझी मैना”
गायनाने दणाणले जनता विद्यालय

लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मानवंदना 




नाशिक, १ ऑगस्ट २०२४: मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय, गोरेराम लेन येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात इयत्ता दहावीचा होतकरू विद्यार्थी प्रसाद भालेकर याने आपल्या अप्रतिम गायनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावी 'अ' च्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुरेख पद्धतीने केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. इयत्ता दहावी 'अ' च्या वर्गशिक्षिका जाधव एस.बी. यांच्या हस्ते व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे व उपस्थित सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती डोखळे एम.एस. होत्या. व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका पिंगळे एम.एस., गायधनी वाय.बी., इयत्ता दहावी 'अ' च्या वर्गशिक्षिका जाधव एस.बी., आणि शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीम. गायखे एस.एम. उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद भालेकर याने केले. त्याच्या प्रभावी वक्तृत्वाने सर्वांचे मन जिंकले. तपस्या नारळे हिने लोकमान्य टिळक यांच्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली, त्यानंतर प्रसादने कार्यक्रमाचा मुख्य भाग सादर केला.

प्रसादने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र संयुक्त चळवळीला नवी उर्जा देणारे आणि अवघा महाराष्ट्र पेटवून उठवणारी राजकीय छक्कड 'माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहीली' हे गीत सादर केले. विशेष म्हणजे प्रसादने हे गीत माईक किंवा स्पीकरचा वापर न करता आपल्या बुलंद पहाडी आवाजात अगदी सुंदर रीतीने गायले.



प्रसादच्या या अनोख्या सादरीकरणाने सर्व उपस्थितांची मने जिंकली. त्याने आपल्या कलेचा विस्तार करत इयत्ता ८ वी ते १० च्या सर्व वर्गांमध्ये जाऊन हेच गीत त्याच उत्साहाने गायले. या अनोख्या प्रयोगामुळे संपूर्ण जनता विद्यालय 'माझी मैना'ने दणाणून गेले. प्रसादच्या या कृतीने खरोखरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना मानवंदना दिल्यासारखे झाले. 



प्रसादच्या या अतुलनीय कलागुणांबद्दल ज्येष्ठ शिक्षिका पिंगळे एम.एस. यांनी विशेष कौतुक केले. त्यांनी प्रसादसह कार्यक्रमाचे नियोजन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकांनी प्रसादच्या या गुणदर्शनामुळे तो भविष्यात एक उत्कृष्ट कलाकार होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.


प्रिती जाधव हिने आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षिका जाधव एस.बी., शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीम. गायखे एस.एम., इयत्ता दहावीचा विद्यार्थी वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले. 

प्रसाद भालेकरच्या या अप्रतिम कलादर्शनाने जनता विद्यालयाने लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना खरी श्रद्धांजली वाहिली. प्रसादच्या या प्रतिभेमुळे शाळेच्या सांस्कृतिक वैभवात भर पडली असून, त्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल सर्वांनी आशावाद व्यक्त केला आहे. 

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती डोखळे एम.एस , ज्येष्ठ शिक्षिका पिंगळे . एम .एस , श्रीमती जाधव एस.बी , शालेय सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीमती गायखे एस. एम , श्रीम. ठाकरे पी.आर , श्रीम. चव्हाण के.एम , श्रीम. घुमरे के.एम. , श्रीम. ठाकरे मॅडम , श्रीम वाघ मॅडम , श्रीम डेर्ले मॅडम , उगले मॅडम , शेळके मॅडम आदी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे आयोजनास - प्रसाद भालेकर, अथर्व तुपे, ओम क्षिरसागर, कृष्णा शिलवंत , कृष्णा बांडे , वेदांत गायकवाड, अनुष गोहील , साईराज पाटील , निरंजन चव्हाण ह्यांचे वादनात तर गायनास तपस्या नारळे, हर्षिता चव्हाण, गौरी जाधव , पायल राजपूत आदी विद्यार्थ्यांचा उत्तुंग सहभाग होता. 

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...