Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

 STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ



नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या संकलित मूल्यमापन परीक्षेचा (PAT) पेपर परीक्षेपूर्वीच सोशल मीडियावर प्रसारित झाल्याची धक्कादायक बाब जीवन केशरी मराठी विद्यार्थी समूह, नाशिक यांनी समोर आणली आहे. इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक निकालात ग्राह्य धरल्या जाणाऱ्या या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका परीक्षेच्या २४ तास तर काही २-३ दिवसांपूर्वीच युट्यूबवर उत्तरांसह उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे.


Y.C. Education Maharashtra या युट्यूब चॅनेलवर दिनांक २२ ऑक्टोबर रोजी झालेल्या मराठी विषयाच्या परीक्षेचा पेपर एक दिवस आधीच प्रसारित करण्यात आला होता. त्याचबरोबर २३ ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेचा पेपरही आधीच उपलब्ध करून देण्यात आला होता. २२ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत या चॅनेलवरून सर्व संबंधित व्हिडिओ हटवण्यात आले असले तरी त्याआधीच ते मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाले होते.


विशेष सुत्रांनी सांगितले की, "हा एकमेव चॅनेल नसून अनेक युट्यूब चॅनेल्स या प्रकारात सामील असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गुगलवर या प्रश्नपत्रिका पीडीएफ स्वरूपातही उपलब्ध आहेत. मागील वर्षीही असाच प्रकार घडला होता, परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे शासनाच्या प्रश्नपत्रिकांची किंमत शून्य झाली आहे."


या घटनेचा सर्वाधिक परिणाम हुशार विद्यार्थ्यांवर होत आहे. प्रश्नपत्रिका आधीच उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास खुंटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोविड काळात तयार झालेल्या इयत्तानिहाय व्हॉट्सअॅप गटांमध्येही या प्रश्नपत्रिका व त्यांची उत्तरे शेअर केली जात असल्याचे समोर आले आहे.


विशेष चिंतेची बाब म्हणजे प्रश्नपत्रिका ज्या शिक्षकांना आणि शाळांनाही वेळेआधी उपलब्ध होत नाहीत आणि ज्यांचे सोशल मीडियावर प्रसारण करण्यास मनाई आहे, त्या या युट्यूब चॅनेलवर कशा काय प्राप्त झाल्या, हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेमुळे आगामी दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका लीक होण्याची भीतीही व्यक्त होत आहे.


सोशल माध्यमांमुळे पेपर फुटी प्रकरणाचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार झालेल्या या प्रश्नपत्रिका वेळेआधीच सोशल मीडियावर कशा प्रसारित होत आहेत, याची चौकशी व्हावी. या प्रकरणामुळे परीक्षा प्रणालीच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०२४

टीयुसीआयचे पाचवे राज्य अधिवेशन संपन्न

 टीयुसीआयचे पाचवे राज्य अधिवेशन संपन्न 

कल्याण ( ७ , आक्टोंबर ) :- टीयुसीआयचे पाचवे राज्य अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनात नवीन राज्य कमिटीची निवड करण्यात आली. ऍड. निलेश सोनवणे यांची अध्यक्षपदी तर अनिल सूर्यवंशी यांची सचिवपदी निवड झाली.


रविवार, 6 ऑक्टोबर 2024 रोजी कल्याण येथील  ऍड. रीना बनसोडे सभागृहात हे अधिवेशन पार पडले. यावेळी टीयुसीआयचे अखिल भारतीय महासचिव कॉ. चार्ल्स जॉर्ज, सचिव कॉ. फ्रेडी ताज्जात, सचिव कॉ. चंद्रशेखर आणि केंद्रीय कमिटी सदस्य ऍड. आदेश बनसोडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


कॉ. फ्रेडी ताज्जात यांनी आपल्या भाषणात सध्याच्या आर्थिक महामंदीवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, तिसऱ्या महामंदीमुळे जगभरातील कष्टकरी जनतेचे शोषण होत आहे आणि लोककल्याणकारी योजना बंद केल्या जात आहेत. त्यांनी कामगार संघटनांना सज्ज होण्याचे आवाहन केले.


कॉ. चार्ल्स जॉर्ज यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली आणि स्थानिक जनतेच्या हक्कांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. कॉ. चंद्रशेखर यांनी जनतेला सडेतोड उत्तर देण्याचे आवाहन केले आणि कम्युनिस्ट पक्षाने सज्ज होण्याचे आवाहन केले.


अधिवेशनात 12 सदस्यीय राज्य कमिटीची निवड करण्यात आली. 13 ते 15 डिसेंबर या काळात हैदराबाद येथे होणाऱ्या टीयुसीआयच्या अखिल भारतीय अधिवेशनासाठी प्रतिनिधी मंडळाची निवडही करण्यात आली.

डॉ. पवारांचे कार्य संस्थेसाठी प्रेरणादायी - उपसभापती मोगल

 डॉ. पवारांचे कार्य संस्थेसाठी प्रेरणादायी - उपसभापती मोगल 

मौजे सुकेणे विद्यालयात कर्मवीर डॉ वसंतराव पवार स्मृतिदिन

मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात कर्मवीर डॉ वसंतराव पवार यांच्या स्मृतिदिन प्रसंगी विचार व्यक्त करताना संस्थेचे उपसभापती डी बी मोगल, व्यासपीठावर प्राचार्य रायभान दवंगे व आदी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता ७- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेसाठी माजी सरचिटणीस कर्मवीर डॉ वसंतराव पवार यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहील असे प्रतिपादन संस्थेचे उपसभापती डी बी मोगल यांनी केले ते मौजे सुकेणे येथील कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व ज्यु कॉलेज येथे आयोजित डॉ पवार यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते प्राचार्य रायभान दवंगे अध्यक्षस्थानी होते व्यासपीठावर उपमुख्याध्यापक अनिल परदेशी पर्यवेक्षक नितीन भामरे आदी उपस्थित होते यावेळी उपसभापती मोगल यांनी कर्म डॉ पवार यांनी नाशिक जिल्ह्यात शैक्षणिक,सामाजिक, राजकीय व वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला सुरुवातीला कर्मवीर डॉ वसंतराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी कु तेजस्वी गुरगुडे हिने व जागृती पवार यांनी तर अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी डॉ पवारांनी संस्थेसाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला सूत्रसंचालन श्रीम शितल शिंदे यांनी तर श्रीमा ज्योती कुशारे यांनी आभार मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 

STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ

  STARS प्रकल्पाच्या परीक्षेत मोठा गैरप्रकार; पेपर लीक प्रकरणाने खळबळ नाशिक, दि. २३ (प्रतिनिधी) - महाराष्ट्र शासनाच्या STARS प्रकल्पांतर्गत ...