Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

मंगळवार, ३० जानेवारी, २०२४

 मविप्र मॅरेथॉन २०२४ चा विजेता ठरला उत्तरप्रदेश अक्षय कुमार ! 




नाशिक:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे रविवारी दि.२८ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या ८ व्या राष्ट्रीय व १३ व्या राज्यस्तरीय नाशिक मविप्र मॅरेथॉन २०२४ स्पर्धेचे विजेतेपद उत्तर प्रदेशच्या अक्षय कुमार याने पटकावले. अक्षय ने २ तास २६ मिनिटे १ सेकंद वेळेत स्पर्धा पूर्ण केली. कडाक्‍याच्या थंडीत पहाटे पावणे सहापासून स्पर्धेला सुरवात झाली. कडाक्‍याच्या थंडीतही धावपटूंचा उत्साह कायम होता.१४ गटात झालेल्या या स्पर्धेत चिमुकल्यांपासून ज्येष्ठ धावपटूंनी सहभाग नोंदविला.४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनने स्पर्धेची सुरवात झाली. भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केलेले आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू मीर रंजन नेगी, मॅरेथॉन स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,केंद्रीय आरोग्यमंत्री खा.भारती पवार, संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले,सभापती बाळासाहेब क्षीरसागर,उपाध्यक्ष विश्वास मोरे,चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती देवराम मोगल,संचालक डॉ सयाजीराव गायकवाड,ॲड.लक्ष्मण लांडगे,रमेश पिंगळे,ॲड.आर के बच्छाव,ॲड.संदीप गुळवे,शिवाजी गडाख,प्रविण जाधव,विजेंद्रसिंग, सेवक संचालक डॉ एस के शिंदे,जगन्नाथ निंबाळकर यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवत स्पर्धेला सुरवात करण्यात आली. 

पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावतांना अक्षय कुमार याने २ तास २६ मिनिटे १ सेकंद अशी वेळ नोंदवत अव्वल क्रमांकासह मॅरेथॉनचे एक लाख रूपयांचे पारितोषिक पटकावले. स्पर्धेसाठी भारतातून उत्तर प्रदेश,पंजाब,हरियाणा,मेघालय तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील धावपटू असे एकूण ३००० च्या वर स्पर्धक सहभागी झाले होते.

     बक्षिस वितरण समारंभ रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाला, यावेळी सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात मविप्र मॅरेथॉन ही सर्वांच्या समन्वयाने निर्विघ्न पार पडली मॅरेथॉन मुळे नाशिक मध्ये एक चांगले वातावरण तयार झाले यामुळे भविष्यात चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास व्यक्त केला.
मॅरेथॉन संयोजन समिती अध्यक्ष व मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी यावेळी बोलतांना ' मविप्र मॅरेथॉन स्स्स्पर्धेच्या यशस्वितेसाठी अत्यंत सुक्ष्म व काटेकोर नियोजन केलेले होते. धावनंमार्ग मापनापासून ते स्पर्धा पूर्ण होईपर्यंत प्रत्येकाने आपली जबाबदारी सक्षमपणे पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याकरीता प्रयत्न करू. संस्थेच्या माध्यमातून स्पोर्ट्स अकॅडमी उभारण्याचा देखील प्रयत्न असून त्यासाठी मीर रंजन नेगी यांचे सहकार्य व मार्गदर्शन घेऊ असे सांगून संस्थेच्या माध्यमातून ७५ हजार पुस्तकांच्या सहाय्याने विश्वविक्रमी शिवप्रतिमा ,सांस्कृतिक महोत्सव,मविप्र पत्रिका असे अनेक दर्जेदार उपक्रम राबविल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मीर रंजन नेगी यांनी भेट दिलेली त्यांची स्वाक्षरी असलेली हॉकी अमुल्य भेट असल्याचे त्यांनी नमूद केले. 

      ऑलिम्पिक खेळाडू मीर रंजन नेगी यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना ' खेळ आपल्याला जीवनात कसे मार्गक्रमण करावे हे शिकवितो. खेळाप्रमाणे जीवनात चढउतार येतात, परंतु प्रत्येकाने न डगमगता अंतिम धेय्य गाठावे असे प्रतिपादन केले. मविप्र संस्थेने अतिशय शिस्तबद्धपणे मॅरेथॉन स्पर्धेचे नियोजन केले असून मविप्र मॅरेथॉन येणाऱ्या काळात नाशिक व जगाची ओळख व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच मविप्र स्पोर्ट्स अकॅडमी साठी आपण विनामोबदला सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी आपल्या खेळ जीवनातील अनेक प्रसंगांना उजाळा देत आठवणी जागविल्या.  

     अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढिकले यांनी ' खेळ व आरोग्याच्या दृष्टीने मविप्र मॅरेथॉन स्पर्धा महत्वाची भूमिका बजावत असून निवास,भोजन व सर्व आरोग्य सुविधा पुरविणारी व खेळाडूंचा मोठा सहभाग असणारी महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहे. मेजर ध्यानचंद यांनी हॉकी खेळ परदेशात लोकप्रिय केला तर नेगी यांच्यावर चित्रित चक दे इंडिया सिनेमामुळे हॉकी सर्वांना माहित झाला असे सांगून हॉकी क्रिकेट च्या बरोबरीने लोकप्रिय होण्यात नेगी यांचे मोठे योगदान असल्याचे डॉ ढिकले यांनी सांगितले.  

   यावेळी विविध १४ गटातील विजेत्यांसह सहभागी धावपटूंना स्पर्धा पूर्ण केल्यानंतर पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी एकूण ७,१६,००० रुपये रकमेची बक्षिसे देण्यात आली. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त झालेल्या रक्तदान शिबिरात सर्वोच्च सहभागाबद्दलचे प्रथम पारितोषिक कर्मवीर ॲड.बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय यांना तर द्वितीय पारितोषिक के टी एच एम महाविद्यालयास व तृतीय पारितोषिक कर्मवीर गणपतदादा मोरे निफाड महाविद्यालयास देण्यात आले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.आर डी दरेकर यांनी करून दिला. स्पर्धा निरीक्षक म्हणून वैजनाथ काळे व संदीप फुगट यांनी काम पहिले. प्राचार्य डॉ आर डी दरेकर यांनी मीर रंजन नेगी यांचा व स्पर्धा संयोजक प्रा.हेमंत पाटील यांनी स्पर्धा निरीक्षक यांचा परिचय करून दिला. या वर्षीचा क्रीडा पत्रकार पुरस्कार मुंबई येथील क्रीडा पत्रकार प्रशांत केणी यांना प्रदान करण्यात आला. सूत्रसंचलन डॉ तुषार पाटील यांनी केले. आभार संस्थेचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे यांनी मानले.

खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादरीकरण केले. तर रावसाहेब थोरात सभागृह परीसरात सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने रंगत वाढवली होती. स्पर्धा यशस्वितेसाठी शिक्षणाधिकारी डॉ नितीन जाधव,डॉ भास्कर ढोके,डॉ विलास देशमुख, डॉ डी डी लोखंडे,डॉ अजित मोरे,प्रा दौलत जाधव,प्रा बी डी पाटील, सोपान जाधव,डॉ.मीनाक्षी गवळी,लहानू कांदळकर,सुनील आहेर, बाळासाहेब शिंदे, के.पी.लवांड, डॉ.ज्ञानेश्वर गडाख, विक्रांत राजोळे,नामदेव काकड, राजेंद्र पोटे,मंगला शिंदे,निर्मला चौधरी,सुहास खर्डे यांनी प्रयत्न केले.

 

गटनिहाय प्रथम क्रमांकाचे विजेते - 

४१ किमी - अक्षय कुमार - उत्तर प्रदेश
२१ किमी - रिंकू सिंग - उत्तर प्रदेश
१० किमी महिला खुला वर्ग - बसंती हेमब्रोम - नाशिक
१० किमी पुरुष खुला गट - दयानंद चौधरी - हर्सूल- नाशिक १२ किमी - २५ वर्षाआतील मुले - अतुल बर्डे - देवळाली कॅम्प
१० किमी - १९ वर्षाआतील मुले - देविदास गायकवाड - दिंडोरी
५ किमी - १७ वर्षाआतील मुले - प्रविण चौधरी - नाशिक
५ किमी - १९ वर्षाआतील मुली - रिंकू चौधरी - नाशिक
४ किमी - १४ वर्षाआतील मुले - चैतन्य श्रीखंडे - झेडपी स्कूल,मोहरा
४ किमी - १७ वर्षाआतील मुली - वंदना तुंबडे - नाशिक
३ किमी - १४ वर्षाआतील मुली - रुपाली सोनवणे - येवला
६ किमी - २५ वर्षाआतील मुली - आरती पावरा - धुळे
४ किमी - ६० वर्षावरील पुरुष - केशव मोटे
५ किमी - ३५ वर्षावरील महिला - अश्विनी देवरे - नाशिक


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...